देशबांधणीमध्ये ‘एल अँड टी’चे मोठे योगदान, देशाला अभिमान वाटेल अशा प्रकल्पांची उभारणी - देवेंद्र फडणवीस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 19, 2017 01:53 AM2017-11-19T01:53:04+5:302017-11-19T01:53:15+5:30
देशबांधणीमध्ये ‘एल अॅण्ड टी’ आणि कंपनीचे अध्यक्ष ए. एम. नाईक यांचे महत्त्वपूर्ण योगदान आहे. ‘एल अॅण्ड टी’ने देशाला अभिमान वाटेल, असे अनेक प्रकल्प उभे केले, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी येथे केले.
मुंबई : देशबांधणीमध्ये ‘एल अॅण्ड टी’ आणि कंपनीचे अध्यक्ष ए. एम. नाईक यांचे महत्त्वपूर्ण योगदान आहे. ‘एल अॅण्ड टी’ने देशाला अभिमान वाटेल, असे अनेक प्रकल्प उभे केले, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी येथे केले.
‘लार्सन अॅण्ड टुब्रो कंपनी’चे समूह अध्यक्ष ए. एम. नाईक यांचे चरित्र ‘द नॅशनलिस्ट’ या पुस्तकाचे प्रकाशन शनिवारी येथे झाले. राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल, रिलायन्स इंडस्ट्रिज लिमिटेडचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक मुकेश अंबानी, ‘एल अॅण्ड टी’चे मुख्य कार्यकारी अधिकारी आणि व्यवस्थापकीय संचालक एस. एन. सुब्रमण्यम, भाईश्री रमेश ओझा, पुस्तकाचे लेखक मिन्हाज मर्चंट उपस्थित होते.
‘एल अॅण्ड टी’च्या माध्यमातून नाईक यांनी देशसेवा केली आहे, असे सांगत मुख्यमंत्री म्हणाले, ते खरे नॅशनलिस्ट आहेत. त्यांचे व्यक्तिमत्त्व बालपणापासूनच देशसेवेचा ध्यास घेत घडत गेले. हे पुस्तक केवळ नाईक यांचा किंवा ‘लार्सन अॅण्ड टुब्रो’चा आतापर्यंतचा प्रवास दाखविणारे नसून, सामान्य माणूस कशा प्रकारे स्वत:ला एखाद्या संस्थेत परिवर्तित करू शकतो, हे दाखविणारे आहे. प्रथमपासून बांधकाम क्षेत्रात असलेली ही कंपनी आता सर्वच क्षेत्रातील भव्य उत्पादनांशी निगडित आहे. महाराष्ट्र शासनासोबतही अनेक प्रकल्प उभारत आहे.
अजित डोवाल म्हणाले, नाईक यांनी खूप काही संधी नसताना, ‘एल अॅण्ड टी’चे भव्य अशा संस्थेत रूपांतरण करून दाखविले. आज शासनाकडून देशबांधणी करण्यासाठी उत्पादकांना मोठे प्रोत्साहन मिळत आहे. देशाच्या संरक्षण क्षेत्रात स्वयंपूर्णता गाठण्यासाठी मोठ्या कंपन्यांनी सहभाग नोंदविणे गरजेचे आहे. ‘मेक इन इंडिया’मध्ये योगदान देणे गरजेचे आहे. नाईक म्हणाले, तीव्र इच्छाशक्ती, कष्ट करण्याची वृत्ती एकनिष्ठा यांच्या माध्यमातून स्वत:च्या, तसेच कंपनीच्या परिवर्तनावर भर दिला. कंपनीने बांधकाम, न्यूक्लीयर, एअरोस्पेसमध्ये महत्त्वाचा वाटा उचलला. भविष्यात संरक्षण, डिजिटल आणि स्मार्ट तंत्रज्ञानात अधिक काम केले जाईल.