Join us

‘त्या’ लॅब टेक्निशियनला न्यायालयीन कोठडी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 18, 2021 4:05 AM

१५ जणांचे जबाब नोंदविले; चारकाेप बनावट कोरोना चाचणी अहवाल प्रकरणलोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : स्वॅब न तपासताच ...

१५ जणांचे जबाब नोंदविले; चारकाेप बनावट कोरोना चाचणी अहवाल प्रकरण

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : स्वॅब न तपासताच केवळ लक्षणे विचारून थेट काेराेना निगेटिव्ह अहवाल देऊन मोकळ्या होणाऱ्या मोहम्मद सलीम मोहम्मद उमर (२९) या लॅब टेक्निशियनला चारकोप पोलिसांनी अटक केली होती. त्याला १५ दिवसांची न्यायालयीन काेठडी सुनावण्यात आली असून, याप्रकरणी आतापर्यंत १५ जणांचे जबाब पोलिसांनी नोंदविले.

उमरने ३७ लोकांकडून १ हजार रुपये घेऊन स्वॅब न घेताच कोरोना निगेटिव्ह अहवाल दिला होता. त्यानुसार या लोकांचा शोध पोलिसांनी घेत त्यांना जबाब दाखल करण्यासाठी बोलावले. आतापर्यंत १५ जणांनी याप्रकरणी जबाब नोंदविल्याचे पोलीस उपनिरीक्षक विजय शिंदे यांनी सांगितले. मात्र, सध्या लॉकडाऊन असल्याने अन्य लोकांनी पोलीस ठाण्यात येण्यासाठी काही दिवसांची मुदत मागितली आहे. पोलिसांनी आतापर्यंत ज्यांचे जबाब नोंदविले आहेत त्यात कोणालाही कोरोनाची लागण झाल्याचे उघड झालेले नाही. उमरने ज्यांना काेराेना निगेटिव्ह अहवाल दिला, त्यापैकी कोणी कोरोना पॉझिटिव्ह आढळते का, याबाबतही पोलीस चौकशी करीत आहेत, तर उमर हा सध्या न्यायालयीन कोठडीत असल्याचेही चारकोप पोलिसांनी सांगितले.

थायरोकेअर लॅबसाठी काम करणाऱ्या आणि मालवणीच्या गेट क्रमांक ८ मध्ये राहणाऱ्या उमरविरोधात एका महिलेने तक्रार दाखल केली होती. या तक्रारीनुसार तिला देण्यात आलेल्या कोरोना अहवालाचा क्यूआर कोड स्कॅन केल्यावर वेगळ्याच रुग्णाची माहिती त्यात उघड झाली, असे तिचे म्हणणे होते. त्यानुसार तपासाअंती चारकोप पोलिसांनी गुन्हा दाखल करून उमरकडे चौकशी सुरू केली आणि त्याने गुन्ह्याची कबुली दिली.

..........................