Join us

शिरपूर दुर्घटनेची कामगार आयुक्तांकडून चौकशी करणार

By ऑनलाइन लोकमत | Published: September 01, 2019 5:40 AM

संजय कुटे : कामगार अधिकारी, मालकाचीही चौकशी होणार

मुंबई : धुळे जिल्ह्यातील शिरपूरजवळील रसायन कारखान्यात झालेल्या दुर्घटनेची कामगार आयुक्तांकडून चौकशी केली जाईल. संबंधित फॅक्टरी मालक व विभागाचे अधिकारी यांचीही चौकशी करून दोषींविरुद्ध कठोर कारवाई करण्यात येईल, असे कामगार मंत्री डॉ. कुटे यांनी सांगितले.

या कारखान्यात कामगारांच्या सुरक्षेविषयक सर्व प्रकारच्या उपाययोजना करण्यात आल्या होत्या का? रसायन निर्मितीची प्रक्रिया व्यवस्थितपणे राबविली जात होती का ? आणि रसायने धोकादायक होती का? याचा तपास कामगार आयुक्तांकडून केला जाईल, असे कामगार मंत्री यांनी जाहीर केले आहे. या प्रकरणाच्या तपासाच्या सूचनाही कामगार आयुक्त यांना देण्यात आल्या असून कामगार उपआयुक्तांना तातडीने धुळे येथे प्राथमिक चौकशीसाठी पाठविण्यात आले आहे. या दुर्घटनेत जखमी झालेले कामगार आणि मृत्यूमुखी पडलेले कामगारांचे कुटुंबातील सदस्यांना कामगार कायद्याच्या अंतर्गत जी मदत देणे शक्य आहे ती सर्व प्रकारची मदत केली जाईल, असेही संजय कुटे यांनी जाहीर केले.

राज्यातील सर्व अतिधोकादायक कंपन्यांची तात्काळ चौकशी करण्यात येईल. तसेच येत्या मंगळवारी मंत्रालयात सबंधित सर्व विभागाच्या अधिकाऱ्यांची बैठक घेऊन कंपनीतील कामगारांची सुरक्षा, कंपनीने सर्व बाबतीत घ्यावयची दक्षता, याबाबत चर्चा करुण एक कृती आराखडा तयार करुन संबंधित सर्व विभागांना पाठविला जाईल अशी माहिती डॉ कुटे यांनी दिली.

टॅग्स :धुळेशिरपूरकामगार