वीज कंत्राटी कामगारांचा ‘कामबंद’चा इशारा
By admin | Published: April 20, 2017 04:54 AM2017-04-20T04:54:13+5:302017-04-20T04:54:13+5:30
वीज क्षेत्रातील महावितरण, महापारेषण आणि महानिर्मिती या तिन्ही कंपनीतील सुमारे २२ हजार वीज कंत्राटी कामगार रोजंदारी कामगार पद्धतीच्या मागणीसाठी बेमुदत काम बंद आंदोलन करणार आहेत.
मुंबई : ऐन उन्हाळ््यात वीज क्षेत्रातील महावितरण, महापारेषण आणि महानिर्मिती या तिन्ही कंपनीतील सुमारे २२ हजार वीज कंत्राटी कामगार रोजंदारी कामगार पद्धतीच्या मागणीसाठी बेमुदत काम बंद आंदोलन करणार आहेत.
कंत्राटी कामगारांच्या अधिवेशनात कामगार कायम होईपर्यंत पहिल्या राज्य विद्युत मंडळातील रोजंदारी कामगार पद्धती पुन्हा राबवावी, असा ठराव झाला होता. ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी ऊर्जा सचिव मुकेश खुल्लर यांच्या अध्यक्षतेखाली वीज
उद्योग संघटना प्रतिनिधी यांची समितीही स्थापन केली होती. या समितीतील सदस्यांचे रोजंदारी कामगार पद्धतीवर एकमत झाले आहे. मात्र आता शासनाकडून आर्थिक बोजाचे कारण सांगत टाळाटाळ होत असल्याचा आरोप संघटनेने केला आहे.
महावितरण कंपनीतील कंत्राटी कामगारांना सध्या किमान वेतन दरमहा ८५०० ते ९००० रुपये अपेक्षित आहे. शिवाय त्यांच्या वेतनाच्या, भविष्यनिर्वाह निधीच्या रक्कमेत दरमहा लाखो रुपयांचा भ्रष्टाचार होत असल्याचे वीज कंत्राटी कामगार संघटनेने म्हटले आहे. मनोज रानडे समितीचे सदस्य सर्वानुमते ठरवून काम बंदचे पत्र संबंधिताकडे सादर केले जाईल, अशी माहिती महाराष्ट्र वीज कंत्राटी कामगार संघाकडून देण्यात आली. (प्रतिनिधी)