Labour Day : आंतरराष्ट्रीय कामगार दिनानिमित्त गुगलचं खास डुडल
By ऑनलाइन लोकमत | Published: May 1, 2018 12:52 PM2018-05-01T12:52:12+5:302018-05-01T13:12:51+5:30
कामगारांच्या संघर्षाचं आणि एकतेचं प्रतीक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या 'आंतरराष्ट्रीय कामगार दिना'निमित्त गुगलने डुडलद्वारे कामगारांच्या संघर्ष आणि त्यागाला अनोखी मानवंदना दिली आहे.
मुंबई - कामगारांच्या संघर्षाचं आणि एकतेचं प्रतीक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या 'आंतरराष्ट्रीय कामगार दिना'निमित्त गुगलने डुडलद्वारे कामगारांच्या संघर्ष आणि त्यागाला अनोखी मानवंदना दिली आहे. या निमित्त गुगलने कामगारांच्या योगदानालाही उजाळा दिला आहे.
तसंच जगभरातील कामगारांना डुडलद्वारे सलाम केला आहे. आजच्या डुडलवर स्टेथॅस्कोप, सुरक्षा हेल्मेट, नट-बोल्ट, पेंटींग रोल, बॅटरी, रबर ग्लोब, चष्मा, टॉर्च, बुट आणि इतर अनेक कामगारांचे साहित्य दाखवण्यात आले आहे.
१ मे हा जागतिक कामगार दिन. श्रमिकांवरील अन्याय व अत्याचाराच्या विरुद्ध संघर्ष व एकजुटीची प्रेरणा देणारा दिवस असून त्याचे महत्त्व कामगारांसाठी चिरंतन राहील. औद्योगिक क्रांतीनंतर व्यापारी, कारखानदार वगैरेचा आर्थिक वर्चस्व असलेला नवा वर्ग अस्तित्वात आला. या वर्गाने राजकीय वर्चस्व हस्तगत केल्यानंतर भांडवलशाही युगाची सुरुवात झाली. अमेरिकन फेडरेशन आॅफ लेबर या संघटनेने असा संकल्प जाहीर केला की १ मे १८६६ पासून सर्व कामगारांसाठी आठ तासांचा कामाचा दिवस लागू करण्यात यावा. या मागणीच्या समर्थनार्थ ३ मे रोजी शिकागो शहरात भव्य रॅलीचे आयोजन करण्यात आले. त्यात पाच लाख कामगारांनी भाग घेऊन शक्तिप्रदर्शन केले.
त्यावेळी हेमार्केटमध्ये बॉम्बस्फोट झाल्याने कामगारांमध्ये धावपळ उडाली. चेंगराचेंगरी झाली. त्यामुळे परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांनी आंदोलक कामगारांवर गोळ्या झाडल्या. त्यात अनेक कामगार ठार झाले. त्यानंतर १८८९ मध्ये या कामगारांच्या स्मरणार्थ १ मे रोजी आंतरराष्ट्रीय कामगार दिवस साजरा करण्याची घोषणा समाजवादी संमेलनात करण्यात आली होती. त्यानंतर दरवर्षी जगभरात १ मे हा दिवस आंतरराष्ट्रीय कामगार दिन म्हणून साजरा केला जातो.