प्रचाराच्या आखाड्यात कामगार नेत्यांची उडी
By admin | Published: February 10, 2017 04:44 AM2017-02-10T04:44:00+5:302017-02-10T04:44:00+5:30
एकेकाळी डाव्या संघटनांचा बालेकिल्ला मानल्या जाणाऱ्या काळाचौकी, कॉटनग्रीन, शिवडी परिसरात आता शिवसेना आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे राज्य आहे
चेतन ननावरे, मुंबई
एकेकाळी डाव्या संघटनांचा बालेकिल्ला मानल्या जाणाऱ्या काळाचौकी, कॉटनग्रीन, शिवडी परिसरात आता शिवसेना आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे राज्य आहे. मात्र तीन दशकांपूर्वी सलग तीन टर्म निवडून येणाऱ्या डाव्या पक्षांनी महापालिका निवडणुकीसाठी कंबर कसली आहे. प्रभाग क्रमांक २०६ चा बालेकिल्ला परत मिळवण्यासाठी महत्त्वाचे कामगार नेते प्रचाराच्या आखाड्यात उतरणार आहेत.
पालिका निवडणुकीत भारिप बहुजन महासंघाने डाव्या पक्षांना सोबत घेऊन तिसरी आघाडी केली आहे. महापालिकेत एकूण १०३ जागा लढण्याचा आवाज देत या आघाडीतील भारिपने ४९, डाव्या पक्षांनी ३० आणि आनंदराज आंबेडकर यांच्या रिपब्लिकन पक्षाने २४ जागांवर उमेदवारांना रिंगणात उतरवले आहे. यामध्ये डाव्या पक्षांचे सर्वाधिक लक्ष हे काळाचौकीतील जागेकडे आहे. कारण एकेकाळी याच प्रभागातून मतदारराजाने सलग तीन टर्म भारतीय कम्युनिस्ट पक्षाने नगरसेवक बाबुराव शेलार यांना महापालिकेत पाठवले आहे. गेल्या दोन दशकांत शिवसेनेने या ठिकाणी अटीतटीच्या लढतीत बाजी मारली आहे. मात्र यंदा परिस्थिती वेगळी असून प्रत्येक पक्ष स्वतंत्रपणे लढत आहे.
शिवसेनेचे सचिन पडवळ यांच्या उमेदवारीवरून परिसरातील शिवसैनिकांत नाराजीचे वातावरण आहे. उचलावू उमेदवार म्हणून पडवळ यांच्यावर आरोप होत आहेत. याशिवाय शिवसेनेतील बंडखोर विजय म्हात्रे हे भाजपाच्या तिकिटावर या ठिकाणी उभे असल्याने सेनेच्या मतांत फूट पडण्याची शक्यता आहे. नगरसेविका हेमांगी चेंबूरकर यांच्या लाचखोरीच्या प्रकरणाने पडवळ यांच्या अडचणींत अधिकच भर पडली आहे.
दरम्यान, भाजपाकडे कार्यकर्त्यांचा दुष्काळ असल्याने म्हात्रे यांनाही निवडणुकीत घाम गाळावा लागणार आहे. मनसेलाही या ठिकाणी बंडखोरीचा फटका बसला आहे. मनसेतर्फे मनविसे उपाध्यक्ष चेतन पेडणेकर यांना उमेदवारी दिल्याने शेखर (गोट्या) मोकल यांनी निवडणुकीच्या आखाड्यात अपक्ष म्हणून दंड थोपटले आहेत. त्यामुळे मनसेचा विजय कठीण झाला आहे. परिणामी सर्वपक्षीय परिस्थिती पाहता, डाव्या पक्षांना या ठिकाणी विजयाच्या आशेचा एक किरण दिसत असल्याचे कम्युनिस्ट नेते कॉम्रेड राजेंद्र काळे यांनी सांगितले.