कामगार नेत्यांनी घेतली शरद पवार यांची भेट

By ऑनलाइन लोकमत | Published: August 14, 2020 01:23 AM2020-08-14T01:23:48+5:302020-08-14T01:24:29+5:30

विविध कामगार मंडळांसह साहाय्य करण्यासोबतच केंद्र सरकारच्या कामगारविरोधी धोरणास राज्य सरकारने विरोध करावा, अशी मागणी शिष्टमंडळाने या वेळी केली.

Labor leaders meet ncp chief Sharad Pawar | कामगार नेत्यांनी घेतली शरद पवार यांची भेट

कामगार नेत्यांनी घेतली शरद पवार यांची भेट

Next

मुंबई : महाराष्ट्र राज्य कामगार संघटना संयुक्त कृती समितीच्या शिष्टमंडळाने गुरुवारी विविध मागण्यांसाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष खासदार शरद पवार, राज्याचे कामगारमंत्री दिलीप वळसे पाटील यांची भेट घेतली. विविध कामगार मंडळांसह साहाय्य करण्यासोबतच केंद्र सरकारच्या कामगारविरोधी धोरणास राज्य सरकारने विरोध करावा, अशी मागणी शिष्टमंडळाने या वेळी केली.

यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानच्या कार्यालयात कृती समितीने असंघटित कामगारांसाठी कल्याणकारी मंडळ, बांधकाम कामगारांना आर्थिक साहाय्य, घरकामगारांची नोंदणी व त्यांच्या योजना, यंत्रमाग-ऊसतोड कामगार, रिक्षाचालक व फेरीवाले मंडळाची स्थापना, स्थलांतरित कामगार कायद्याची अंमलबजावणी, कामगारविषयक त्रिपक्षीय समित्यांचे गठण इत्यादी मुद्द्यांवर या वेळी विस्ताराने चर्चा झाली. कामगार संघटना संयुक्त कृती समितीच्या वतीने डी.एल. कराड, विश्वास उटगी, संजय वढावकर, एम.ए. पाटील, दिवाकर दळवी यांनी कामगारांच्या समस्या मांडल्या. कामगारांच्या समस्यांबाबत सकारात्मक निर्णय घेण्याचे आश्वासन दोन्ही नेत्यांनी दिल्याचे शिष्टमंडळाने सांगितले.

राज्यातील महाविकास आघाडी सरकारच्या स्थापनेनंतर अद्याप कामगारविषयक त्रिपक्षीय समित्या गठित केलेल्या नाहीत. त्यामुळे राज्य कामगार सल्लागार मंडळ, किमान वेतन समिती यासह माथाडी मंडळ, सुरक्षारक्षक मंडळ, बांधकाम कामगार कल्याण मंडळ, ही सर्व मंडळे अधिकाऱ्यांमार्फत चालवली जात आहेत. त्यामुळे ही मंडळे गठित करून त्यावर लोकप्रतिनिधी, मालक आणि कामगार संघटनांचे प्रतिनिधी घ्यावेत, अशी मागणी कृती समितीने केली. घर कामगार कल्याण मंडळासाठी आर्थिक तरतुदीचे आश्वासन देतानाच लॉकडाऊन काळाचे वेतन देण्याबाबत परिपत्रक काढण्यात येईल, असेही त्यांनी सांगितले.

Web Title: Labor leaders meet ncp chief Sharad Pawar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.