Join us

लोकसभेची मेहनत आली फळाला; ४२ हजार मते घेत मनसे आली पुन्हा चर्चेत

By ऑनलाइन लोकमत | Published: October 26, 2019 2:22 AM

गेल्या काही दिवसांत भांडुपमधून गायब झालेली मनसे पुन्हा चर्चेत आली.

मुंबई : कोकणी मराठीबहुल मतदारसंघ आणि सेनेचा गड मानल्या जाणाऱ्या भांडुप विधानसभा मतदारसंघामध्ये शिवसेनेचे रमेश कोरगावकर यांनी पक्षासोबतची एकनिष्ठा आणि लोकसभेला दिलेल्या पाठिंब्यामुळे २९ हजार १७३ मतांनी आघाडी घेत विजय मिळवला. लोकसभेची मेहनत फळाला आल्याचे दिसून आले. दुसरीकडे गेल्या काही दिवसांत भांडुपमधून गायब झालेली मनसे पुन्हा चर्चेत आली. ४२ हजार मते घेत मनसे दुसऱ्या क्रमांकावर पोहोचली. माहिम विधानसभामधून रिंगणात असलेल्या संदीप देशपांडेंपेक्षा जास्त मते त्यांना या मतदारसंघात पडली आहेत.

मनसेच्या स्थापनेवेळी शिवसेनेच्या या गडाला खिंडार पडले होते. या वेळी माजी आमदार अशोक पाटील यांचे तिकीट शेवटच्या क्षणी कापून पक्षाने कोरगावकरांना उमेदवारी जाहीर केली. त्यामुळे बंडखोरी मोडून काढत विजयी होण्यासाठी कोरगावकरांसाठी ही निवडणूक प्रतिष्ठेची बनली होती. काँग्रेसनेही ज्येष्ठ नगरसेवक सुरेश कोपरकर यांना रिंगणात उतरविल्याने ही लढत तिरंगी ठरली होती. कोरगावकर यांनी लोकसभेला भाजप खासदार मनोज कोटक यांच्या प्रचारात संपूर्ण भांडुप पिंजून काढला होता.त्यांच्या या मेहनतीमुळे भाजपचे कार्यकर्ते प्रचारात उतरले होते.

सेना-भाजपच्या एकत्रित मतांत भर पडली. डोंगराळ भाग उतरून वृद्धांनी मतदान केले़ मतदानाचा टक्का वाढला. मतमोजणीच्या पहिल्या राउंडमध्ये आघाडी मिळवत कोपरकर यांनी निकालाची चुरस आणखीनच वाढवली होती. त्यानंतर कोरगावकर यांनी घेतलेली आघाडी शेवटपर्यंत कायम राहिली. अंतिम निकालावेळी ३० हजार ७१७ मतांवर समाधान मानत कोपरकर तिसºया क्रमांकावर पोहोचले.

मनसेचे उमेदवार जळगावकर यांनी कोरगावकरांना चांगली टक्कर दिली. त्यांना दुसºया क्रमांकाची २६.८६ टक्के म्हणजेच ४२ हजार ७८२ मते मिळाली. एकूण मतदानाच्या ४५.१७ टक्के म्हणजेच ७१ हजार ९५५ मते मिळवून कोरगावकर विजयी झाले. येथे वंचित बहुजन आघाडीचा फारसा प्रभाव दिसला नाही. वंचितचे उमेदवार सतीश माने यांना अवघी ७ हजार ५०३ मते पडली.कोपरकर यांना मुस्लीम वस्ती असलेल्या सोनापूरमधील एकगठ्ठा मतांसह झोपडपट्टी विभागातील मते मिळाली. राज ठाकरे यांच्या सभेमुळे मनसेने मोठ्या प्रमाणात मराठी मतांचा टक्का आपल्या बाजूने वळवला.

टॅग्स :महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019भांडुप पश्चिम