कामगार सुरक्षेचा जागर

By admin | Published: March 12, 2016 02:26 AM2016-03-12T02:26:08+5:302016-03-12T02:26:08+5:30

औद्योगिक कामगारांमध्ये सुरक्षेविषयी जनजागृती व्हावी आणि त्यांना सुरक्षेची जाणीव व्हावी, यासाठी औद्योगिक सुरक्षा व आरोग्य संचालनालय यांच्या वतीने शुक्रवारी औद्योगिक सुरक्षा रॅली काढण्यात आली.

Labor safety jacks | कामगार सुरक्षेचा जागर

कामगार सुरक्षेचा जागर

Next

अंबरनाथ : औद्योगिक कामगारांमध्ये सुरक्षेविषयी जनजागृती व्हावी आणि त्यांना सुरक्षेची जाणीव व्हावी, यासाठी औद्योगिक सुरक्षा व आरोग्य संचालनालय यांच्या वतीने शुक्रवारी औद्योगिक सुरक्षा रॅली काढण्यात आली. या रॅलीला झालेली गर्दी हेच सुरक्षा सप्ताहाचे यश होते. सुमारे १० हजारांहून अधिक कामगार या रॅलीत सहभागी झाले होते.
राज्य सरकारच्या वतीने सुरक्षा सप्ताहानिमित्त राज्यात विविध कार्यक्रम सुरू आहेत. औद्योगिक सुरक्षा व आरोग्य संचालनालयाच्या वतीने सुरक्षा ज्योत राज्यभरात फिरविली जात आहे. ४ मार्च रोजी मुख्यमंत्र्यांच्या हस्ते नागपूर येथे ज्योत प्रज्वलित करण्यात आली. ही सुरक्षा ज्योत शुक्रवारी अंबरनाथ-आनंदनगर औद्योगिक वसाहतीत आणण्यात आली. ठाणे जिल्ह्यातील विविध कंपन्यांमधील कामगार रॅलीत मोठ्या संख्येने सहभागी झाले. सुरक्षेविषयी माहितीपट दाखवण्यात आला. तसेच कामगारांनी पथनाट्य आणि समूहगीतांच्या माध्यमातून सुरक्षेचा संदेश दिला. अंबरनाथ येथील ‘आमा’ संघटनेच्या पुढाकाराने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. त्यांना ठाणे औद्योगिक सुरक्षा विभागाचे सहसंचालक अ.रा. अष्टपुत्रे आणि कल्याण येथील औद्योगिक सुरक्षा विभागाचे सहसंचालक रा.बा. लाखे यांनी सहकार्य केले. औद्योगिक सुरक्षा व आरोग्य संचालनालयाचे संचालक जयंत मोडगरे यांच्या नेतृत्वाखाली संपूर्ण रॅलीचे नियोजन करण्यात आले होते. आनंदनगर येथील निवासी शिबिर मैदानावरून रॅलीला प्रारंभ झाला. संपूर्ण आनंदनगर औद्योगिक वसाहतीमधून ही रॅली काढण्यात आली.
रॅलीला मार्गदर्शन करताना आमदार डॉ. बालाजी किणीकर यांनी कामगारांनीच कामगारांच्या सुरक्षेसाठी एकत्रित येण्याची गरज आहे, असे सांगितले. आपल्या हातून कोणताही अनुचित प्रकार घडणार नाही, यासाठी स्वत: कामगारांनी सुरक्षेची साधने वापरावीत. साधने नसतील तर आपल्या अधिकाऱ्यांकडून मागून घ्यावीत, असा सल्लाही त्यांनी दिला. तर बांधकाम सभापती सदाशिव पाटील यांनी अंबरनाथमध्ये ८०० कारखानदार असतानाही कामगारांचे मालकांसोबतचे संबंध चांगले आहेत. तेढ निर्माण होऊ नये यासाठी ‘आमा’ संघटनेचे अध्यक्ष उमेश तायडे हे प्रयत्नशील दिसतात, असेही स्पष्ट केले. (प्रतिनिधी)रॅलीसाठी १० हजारांहून अधिक कामगार आल्याची नोंद संघटनेने केली होती.
ठाण्याच्या मॉनडलीस कॅडबरी कंपनीच्या कामगारांनी
सुरक्षा कशी आणि केव्हा
घ्यावी, हे पथनाट्यातून सादर केले.
भारत बिजली कंपनीच्या कामगारांनी सुरक्षेवर तयार केलेले गीत सादर केले.
कामगारांसाठी ठिकठिकाणी पिण्याच्या पाण्याची आणि अल्पोपाहाराची सोय केली होती.
रॅलीमध्ये सुरक्षेविषयी चित्ररथ तयार करून जनजागृती करण्याचा प्रयत्न केला. सुरक्षेच्या साधनांचे प्रदर्शनही भरविले होते.
या सुरक्षा सप्ताहाची सांगता तळोजा औद्योगिक वसाहतीमध्ये शनिवारी होणार आहे.

Web Title: Labor safety jacks

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.