Join us

गोरखपूरला 1800 प्रवाशांना घेऊन निघालेली श्रमिक ट्रेन भरकटली, ओडिशालाच पोहोचली

By ऑनलाइन लोकमत | Published: May 23, 2020 7:33 PM

कोरोनाच्या लॉकडाऊन मुळे मीरा भाईंदर मध्ये अडकलेल्या मूळच्या 28 हजार उत्तर प्रदेशवासियांनी आपल्या गावी रेल्वेने जाण्यासाठी अर्ज भरले होते .

धीरज परब / मीरारोड - मीरा भाईंदर मधील कामगारआदी 1800 प्रवाश्यांना घेऊन 21 मे रोजी सायंकाळी उत्तर प्रदेशच्या गोरखपूर साठी निघालेली श्रमिक ट्रेन भरकटली आहे . सुमारे  25 तासात गोरखपूरला पोचणारी सदर ट्रेन 48 तास उलटले तरी गोरखपूरला न पोहचता ओडिशातून पश्चिम बंगाल नंतर झारखंडला दाखल झाल्याने आतील लहान मुलं , महिला व अन्य प्रवाश्यांचे पाणी - अन्ना  वाचून हाल होत आहेत. ट्रेन 60 ते 65 तासांनी गोरखपूरला रविवारी सकाळी पोहचेल अशी शक्यता आहे . चालक मार्ग चुकल्याचे प्रवाश्यांनी सांगितले . रेल्वेच्या भोंगळ कारभारावर टीकेची झोड उठत असून दुसरीकडे रेल्वे प्रशासन मात्र सारवासारव करण्यात गुंतले आहे . 

कोरोनाच्या लॉकडाऊन मुळे मीरा भाईंदर मध्ये अडकलेल्या मूळच्या 28 हजार उत्तर प्रदेशवासियांनी आपल्या गावी रेल्वेने जाण्यासाठी अर्ज भरले होते . परंतु उत्तर प्रदेश मधील योगी आदित्यनाथ सरकार तसेच रेल्वे प्रशासना कडून परवानगी नसल्याने  मीरा भाईंदर मधील अडकलेल्या कामगार , मजुरांसाठी एकही श्रमिक ट्रेन सुटत नव्हती . या मुळे नाईलाजाने असंख्य लोकांनी पायी वा ट्रक , टेम्पोने जाण्यास सुरवात केली . एसटी बस मध्यप्रदेश सीमेवर मोफत सोडत असल्याने लोकांना मोठा दिलासा मिळाला.

अखेर गुरुवार 21 मे रोजी गोरखपूर साठी रात्री सव्वा सात वाजता मीरा भाईंदर मधील 1800 लोकांना घेऊन गोरखपूर साठी ट्रेन सोडण्यात आली . वसई वरून सुटलेली सदर ट्रेन नागपूर मार्गे गोरखपूरला सुमारे 25 तासात पोहचणे अपेक्षित होते . परंतु आज शनिवारी सकाळी ट्रेन ओडिशा राज्यातील रोवुरकेला जंक्शनवर पाहून प्रवाश्याना धक्काच बसला . सदर ट्रेन ओडिशातून पश्चिम बंगाल मध्ये पोचली . तिथून सायंकाळी ती झारखंड मधील सुभाषचंद्र बोस रेल्वे स्थानकात पोहचली होती . पुढे बिहार मधून ती गोरखपूरला जाणार असल्याचे सांगण्यात आले . 

ट्रेन भरकटलेली असल्याचे लक्षात येताच प्रवाश्यां मध्ये संताप व्यक्त होत आहे. रेल्वे प्रशासनाचा हा अतिशय भोंगळ व बेजबाबदार कारभार असल्याची टीका होत आहे . ट्रेन मधील प्रवाश्यांचे तर हाल होत असून मधील बुधवारी ना ट्रेनची चे सदर भरकटलेली ट्रेन गोरखपूरला कधी पोहचणार याची माहिती सुद्धा प्रवाश्याना नाही . तर सदर ट्रेन सोडल्याचे श्रेय घेणारे व फोटो काढण्यासाठी भाईंदरच्या जेसलपार्क खाडी किनारी जमणारे लोकप्रतिनिधी व हौशे राजकारणी मात्र आता रेल्वेच्या भोंगळपणा बद्दल मूग गिळून गप्प आहेत. रेल्वे प्रशासना कडून मात्र , वसई वरून 21 रोजी सुटलेली सदर ट्रेन भुसावळ , इटारसी मार्गे जाणार होती . परंतु मोठ्या संख्येने श्रमिक ट्रेन सोडल्या असल्याने रेल्वे मार्गावर मोठी कोंडी झाल्याने सदर ट्रेन बिलासपूर , आसनसोल मार्गे वळवण्यात आल्याचे सांगण्यात आले . 

विशाल सिंग हा ट्रेन मधील प्रवासी  म्हणाला कि , रेल्वे प्रशासना कडून काहीच अधिकृत माहिती दिली जात नाही आहे . आम्हाला पाणी प्यायला नाही व खाण्याची देखील कोणतीच सोय केली गेलेली नाही . लहान मुलं , महिला असून त्यांचे अतोनात हाल होत आहेत . मोटरमन रेल्वे मार्ग चुकला असे सांगितले जात आहे. ट्रेनमधील आणखी एक प्रवासी मोहम्मद अली खान म्हणाले कि , महाराष्ट्रात होतो तेव्हा आम्हाला जेवण , खाणे , पाणी याची कोणतीच अडचण भासली नाही . महाराष्ट्रात असे पर्यंत आम्हाला सर्व मिळाले . परंतु महाराष्ट्र सोडून गाडी ओडिशा , पश्चिम बंगाल, झारखंड मध्ये भरकटल्या पासून आम्हाला कोणी वाली नाही . जेवण - पाणी काही मिळत नसून ट्रेन पोहचायला आणखी एक का दोन दिवस लागणार हे देखील सांगितले जात नाही.

टॅग्स :मुंबईरेल्वेस्थलांतरणमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस