नवी दिल्ली - देशभरातील विविध कामगार संघटनांकडून ८ जानेवारी म्हणजे उद्या भारत बंदचं आवाहन केलं आहे. यामध्ये अनेक कामगार संघटनांनी या काम बंद आंदोलनाला पाठिंबा दिला आहे. बँकांचे कर्मचारीही या आंदोलनात सहभागी होणार आहे. त्यामुळे बँकांच्या कामकाजावर याचा परिणाम होणार आहे. बँका बंद राहिल्यास ८ आणि ९ जानेवारी रोजी एटीएममधील कॅशवरही परिणाम होणार आहे.
याबाबत ट्रेड युनियनकडून सांगण्यात आलं आहे की, जवळपास देशातील २५ कोटी कामगार या भारत बंद आंदोलनात सहभागी होणार आहेत. INTUC, AITUC, HMS, CITU, AIUTUC, TUCC, SEWA, AICCTU, LPF, UTUC या कामगार संघटनात आंदोलनात सहभागी होणार आहेत तर त्याचसोबत शिक्षक कामगार संघटनेच्या ६० युनियन, राज्यातील मंत्रालय कामगार संघटनेनेही या आंदोलनाला पाठिंबा दिला आहे.
या बँक युनियनचे कामगार संपावर?ऑल इंडिया बँक असोसिएशन, ऑल इंडिया बँक ऑफिसर्स असोसिएशन, बँक कर्मचारी सेना अशा संघटनांनी पाठिंबा दिल्याने बँकांच्या कामकाजावर परिणाम होणार आहे. केंद्र सरकारच्या कामगार धोरणांविरोधात हा बंद पुकारण्यात आला आहे. मात्र कामगार मंत्रालयाकडून कर्मचाऱ्यांना आदेश देण्यात आलेत की, जर या संपात सहभागी झाला तर त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल तसेच त्यांचे वेतन कापले जाईल.
2 जानेवारी रोजी कामगार संघटनेच्या प्रतिनिधींनी कामगारमंत्र्यांशी भेट घेतली परंतु या भेटीत तोडगा निघू शकला नाही. यामुळे कामगार संघटनेने 8 रोजी जाहीर केलेला संप मागे न घेण्याचा निर्णय घेतला. कामगार संघटनांनी केंद्र सरकारच्या आर्थिक आणि लोकविरोधी धोरणांचा निषेध करण्यासाठी हा संप आयोजित केला आहे. याव्यतिरिक्त, ते प्रस्तावित कामगार कायद्यालाही विरोध करीत आहेत. शैक्षणिक संस्थांमध्ये फी वाढीस विद्यार्थी संघटना विरोध करीत आहेत.
या बंदमुळे बँकांकडून रोख रक्कम काढणे आणि जमा करणे शक्य होणार नाही, शिवाय चेक क्लिअरिंगही केले जाणार नाही. तथापि, ऑनलाइन बँकिंगच्या कामकाजावर कोणताही परिणाम होणार नाही. अनेक बँकांनी 8 जानेवारीला बंद राहील अशी माहिती शेअर बाजाराला दिली आहे.