मुंबई : मुंबईकरांचे आरोग्य सुदृढ व निरोगी राहावे या दृष्टिकोनातून लवकरच पालिकेच्या रुग्णालयांमध्ये नवीन संशोधन, वैशिष्ट्यपूर्ण प्रयोगशाळा आणि अत्याधुनिक सेवासुविधा आणण्यात येणार आहेत. त्यासाठी पालिकेच्या अर्थसंकल्पात विविध योजना व प्रकल्पांची घोषणा करण्यात आली आहे. त्यात क्षय, कुष्ठरोग, संसर्गजन्य आजार, नेत्रविकार अशा विविध आजारांचा समावेश आहे.
नाशिक येथील महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ यांच्या सहयोगाने कस्तुरबा रुग्णालयात संसर्गजन्य रोग प्रशिक्षण आणि संशोधनाकरिता आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या प्रादेशिक केंद्राची स्थापना करण्यात येणार आहे. साथरोगांच्या परिणामकारक संशोधन व अचूक निदानाकरिता यंदाच्या वर्षात केंद्र सरकारच्या सहयोगाने नवीन अद्ययावत बीएसएल- ३ प्रयोगशाळा सुरू करण्यात येणार आहे. तसेच, पीसीआर या अद्ययावत प्रयोगशाळेत डेंग्यू आजारासाठी जिनोम सिक्वेन्सिंग तपासणी तसेच अँटि मायक्रोबायल रेझिस्टंटबाबत संशोधन करण्यात येणार आहे. कस्तुरबा रुग्णालयात टीबीसी, डीटीसी प्रयोगशाळा लवकरच कार्यान्वित होणार आहेत.
ग्रँटरोड येथील मुरली देवरा म्युनिसिपल नेत्र रुग्णालयाच्या सध्याच्या इमारतीमागील भूखंडावर १६ मजली मल्टिस्पेशालिटी रुग्णालयाचे बांधकाम सुरू असून, पुढील दोन वर्षात हे बांधकाम पूर्ण होईल. उर्वरित मजल्यांवर विविध स्पेशालिटी, बाह्यरुग्ण विभाग, आरोग्य केंद्रे, दवाखाने व डायलेसिस सेंटर करण्यात आले आहेत. फोर्ट येथील सेठ ए.जे.बी. महानगरपालिका कान, नाक, घसा रुग्णालयात कर्णबधिर व बोलू न शकणाऱ्या मुलांच्या कॉक्लियर इंप्लांट शस्त्रक्रियेसाठी नव्या वर्षांत ६० लाख रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. त्याचप्रमाणे, मुंबईतील कुष्ठरोग प्रसाराची साखळी खंडित करण्यासाठी लवकरच दिशादर्शक आराखडा तयार करण्यात आलेलाआहे.
क्षयरोग प्रतिबंध उपचार पद्धती सुरू होणार :
■ देशातून २०२५ पर्यंत क्षयरोगाचे निर्मूलन करण्याच्या उद्दिष्टानुसार क्षयरोग रुग्णांचे त्वरित निदान करणे आवश्यक आहे. म्हणूनच, आर्टिशिफियल इंटेलिजन्सद्वारे रुग्णांचे तत्काळ निदान करण्याकरिता बृहन्मुंबई महानगरपालिकेने प्रत्येक विभागात एक याप्रमाणे २४ विभागात २४ अद्ययावत मशिन्स आणि २४ हॅण्डहेल्ड एक्स-रे मशिन्स उपलब्ध करण्याचे प्रस्ताविले आहे. • बृहन्मुंबई महानगरपालिकेने, स्माइल संशोधन संस्थेच्या सहयोगाने, जिनोम सिक्वेन्सिंग या आधुनिक चाचणीद्वारे क्षयरोगाचे निदान करण्यास सुरुवात केली आहे.
भविष्यात, औषध प्रतिरोधक क्षयरोगाच्या उपचारामध्ये सदर चाचणी सहायक ठरणार आहे. सद्य:स्थितीत, बृहन्मुंबई महानगरपालिकेतर्फे औषध संवेदनशील क्षयरोग रुग्णांना प्रतिबंधात्मक उपचार पुरविण्यात येतात. औषध प्रतिरोधी रुग्णांसोबत राहणाऱ्यांकरिताही क्षयरोग प्रतिबंध उपचार पध्दती सुरू करण्यात येणार आहे. नव्या वर्षात शिवडी येथील क्षयरोग रुग्णालय समूह येथे दहा बेडचे निगेटिव्ह प्रेशर इंटेन्सिव्ह रेस्पिरेटरी केअर युनिट सुरू करण्यात येणार आहे.