Join us  

चौथ्या मजल्यावरून पडून मजुराचा मृत्यू, पोलिसांनी कंत्राटदाराला घेतले ताब्यात

By ऑनलाइन लोकमत | Published: May 07, 2023 7:05 AM

याप्रकरणी पोलिसांनी कंत्राटदार अख्तर अहमद खान (३८) याला ताब्यात घेतले आहे.

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : चौथ्या मजल्यावर लिफ्टच्या बांधकामासाठी बनवलेल्या बांबूच्या परांचीवरून खाली पडून आफताब खान (२२) या मजुराचा मृत्यू झाला. याप्रकरणी पोलिसांनी कंत्राटदार अख्तर अहमद खान (३८) याला ताब्यात घेतले आहे.

कांदिवली पश्चिम परिसरात डहाणूकरवाडीत अनंतराज को-ऑपरेटिव्ह हाउसिंग सोसायटीमध्ये लिफ्ट बसवण्याचे काम तीन जण करत होते. त्यावर कंत्राटदार देखरेख करत होता. सुरक्षा अधिकारी वा पर्यवेक्षक नेमण्यात आला नव्हता. ४ मे रोजी तक्रारदार फैज खान (१९) हे त्यांचा सहकारी पवन यादव (२३) यांच्यासोबत चौथ्या मजल्यावरून लिफ्टचे पार्ट फिट करून पाचव्या मजल्यावर जात होते. त्याचवेळी डोक्यात हेल्मेट, सेफ्टी बेल्ट, ग्लोव्हज न घातलेला आफताब हा चौथ्या मजल्यावर येत असताना परांचीवरील बांबू फिरल्याने त्याचा हात त्यावरून सुटला आणि तो चौथ्या मजल्यावरून थेट खाली तळाला लिफ्टच्या जागेत जाऊन पडला. त्याला तातडीने चव्हाण रुग्णालयात हलविण्यात आले. तिथे उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला.

मालाडमध्येही...

मालाड पूर्वच्या मयूर अपार्टमेंट बांधकामाच्या ठिकाणी बाराव्या मजल्यावर काम करणारा मजूर दीपू गोविंद (२०) याचाही लिफ्टची वायर व सेफ्टी बेल्टची दोरी तुटून लिफ्टसह खाली पडून मृत्यू झाला. पोलिस चौकशीत मयूर अपार्टमेंटचा विकासक व लेबर कॉन्ट्रॅक्टर भगवान गुरिया याच्या निष्काळजपणामुळे हा प्रकार घडल्याचे उघडकीस आल्यावर त्याच्या विरोधात दिंडोशी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

टॅग्स :मुंबईपोलिस