- नितीन जगताप
मुंबई : मुंबईतील वाहतूक पोलिसांच्या अनेक चौक्यांमध्ये सुविधांची वानवा असून ऊन- पावसात वाहतुकीचे नियंत्रण करून चोख कर्तव्य बजावणाऱ्या पोलिसांची गैरसोय होत आहे.
वाहतूक पोलीस विभागीय चौक्यांमध्ये गेल्यानंतर गणवेश परिधान करून आपल्या कर्तव्यावर रुजू होतात. पण याच चौक्यांमध्ये मूलभूत सोयी-सुविधांची कमतरता आहे. एका विभागीय चौकीमध्ये एका पाळीत १०० ते १२५ पोलीस कर्मचारी असतात. परंतु काही ठिकाणी या कर्मचाऱ्यांसाठी एकच शौचालय आहे. एकावेळी अनेक कर्मचारी आल्यास त्यांना ताटकळत उभे राहावे लागते. काही ठिकाणी पाण्याची सुविधाही नाही.
सर्व वाहतूक पोलिसांना कपडे बदलण्यासाठी एकच चेंजिग रूम आहे. मुंबईमध्ये वाहतूक पोलिसांचे ३४ विभाग आहेत त्यामध्ये २८०० पोलीस कर्मचारी आणि अधिकारी काम करतात. वाहतुकीचे नियमन करण्याबरोबरच, प्रवाशांना मदत करणे अशी अनेक कामे वाहतूक पोलीस करत असतात.
परंतु त्यांना मूलभूत सेवांपासून वंचित राहावे लागत आहे. प्रशासनाने पाणी, शौचालयाची सुविधा आणि चेंजिंग रूम वाढवायला हवेत, अशी मागणी वाहतूक पोलिसांनी केली आहे.
होय, विभागीय चौक्यांमध्ये सुविधांची कमतरता आहे, त्याबाबत आम्ही माहिती संकलित करणे सुरू केले आहे. या सुविधांबाबत एमएमआरडीए आणि पालिका अधिकाºयांकडे पाठपुरावा केला आहे, त्याला संबंधित अधिकाºयांनी अनुकूलता दर्शविली आहे. येत्या सहा महिन्यांत परिणामकारक निकाल दिसेल अशी अपेक्षा आहे.- मधुकर पांडे, सह पोलीस आयुक्त, वाहतूक विभाग