बिरवाडी : विकासकामे करताना विकासकामांमध्ये पारदर्शकता यावी याकरिता शासनाने आॅनलाइन निविदा प्रक्रिया सुरू केली असली तरी या निविदा प्रक्रियेमुळे ग्रामपंचायतीच्या विकासकामांनाच खो बसत असल्याची धक्कादायक बातमी समोर आली आहे. बिरवाडी ग्रामपंचायतीमध्ये सुमारे ३८ लाख ८ हजार रुपयांची विकासकामे आॅनलाइन निविदा प्रक्रियेमुळे प्रलंबित असल्याची माहिती बिरवाडीचे सरपंच लक्ष्मण पवार यांनी दिली. महाड तालुक्यातील आर्थिकदृष्ट्या सक्षम समजल्या जाणाऱ्या बिरवाडी ग्रामपंचायतीच्या स्थानिक ग्रामविकास निधीतून सुमारे ३८ लाख ८ हजार रुपये एवढा निधी खर्च करून रस्ते विकास त्याचप्रमाणे सामाजिक सभागृह उभारण्यात येणार आहे, मात्र आॅनलाइन प्रक्रियेमुळे या विकासकामांना चालना मिळण्यास विलंब होत आहे.आदर्शनगर ते वेरखोले या अंतर्गत रस्त्याची अत्यंत दुरवस्था झाली असून यामुळे या परिसरातील नागरिक कमालीचे त्रस्त झाले आहेत. त्यामुळे पावसाळ्यापूर्वी हा रस्ता न झाल्यास या परिसरातील वाहतूक ठप्प होऊ शकते. आॅनलाइनमुळे तब्बल ३० दिवसांपेक्षा जास्त कालावधी निविदा प्रक्रिया पूर्ण करण्यातच जातो. १३ लाख १८ हजार एवढा निधी रस्त्याच्या डांबरीकरणासाठी मंजूर केला आहे, बिरवाडी जुनी बाजारपेठ रस्त्याच्या डांबरीकरणाकरिता १४ लाख ९० हजार रुपये, तर कुंभारपाडा, बिरवाडी येथील समाज मंदिराकरिता १० लाख रुपयांचा निधी मंजूर केला आहे, मात्र आॅनलाइन प्रक्रिया सक्तीची असल्याने ग्रामपंचायतींच्या विकासकामांना लगाम बसत आहे. (वार्ताहर)
आॅनलाइनमुळे ग्रामपंचायतीच्या विकासाला बसतोय खो?
By admin | Published: April 12, 2015 11:54 PM