उरण : पनवेल प्रादेशिक परिवहन विभागाने उरणकरांसाठी महिन्यातील चार कॅम्पची संख्या घटवून एकवर आणून ठेवली आहे. त्यामुळे वाहनधारकांची मोठी गैरसोय होत आहे. त्या व्यतिरिक्तही पनवेल कार्यालयात अनेक सुविधांचा अभाव असल्याने उरणवासी त्रस्त झाले आहेत. पनवेल प्रादेशिक कार्यालयातील वाहन चालकांना भेडसाविणाऱ्या समस्या दूर केल्या जाव्यात व उरणकरांसाठी महिन्यात किमान दोन कॅम्प घेण्यासाठी प्रयत्न करण्याची मागणी शिवसेनेचे घारापुरी ग्रामपंचायत सदस्य बळीराम ठाकूर यांनी खासदार श्रीरंग बारणे यांच्याकडे निवेदनाव्दारे केली आहे.उरण तालुक्यातील वाहनधारकांची कामे याआधी पेण तर तालुका नवी मुंबईशी जोडल्यानंतर वाशी आरटीओकडे केली जात होती. वाशी आरटीओ विभागाने उरणकरांसाठी महिन्याला चार कॅम्पची सोय केली होती. त्यानंतर ११ नोव्हेंबर २०११ रोजी पनवेल प्रादेशिक परिवहन विभागाची स्थापना झाली. उरणवासीयांना वाहनासंबंधित कामासाठी पनवेल कार्यालयाकडे धाव घ्यावी लागते. पनवेल आरटीओने सुरूवातीच्या काळात वाहनासंबंधित कामकाजासाठी महिन्याला चार कॅम्प ठेवले होते. गतवर्षापासून पनवेल आरटीओने महिन्यातील चार कॅम्पची संख्या दोन आणि दोनवरून घटवून एकवर आली आहे. उरण तालुक्यातील वाहनांची संख्या पाहता एक कॅम्प अपुरा पडत आहे. त्यामुळे लायसन्स काढणे, वाहन नोंदी करणे, वाहन पासिंग, लायसन्स रिन्ह्यूवल करणे आदी कामांसाठी पनवेल कार्यालयात जावे लागते. यामुळे नाहक वेळ आणि आर्थिक भुर्दंड सोसावा लागत असल्याची तक्रार निवेदनातून केली आहे. या व्यतिरिक्त वाहनधारकांना अनेक समस्यांचा सामना करावा लागत असल्याचे यावेळी त्यांनी सांगितले. (वार्ताहर)
पनवेल परिवहनमध्ये सुविधांचा अभाव
By admin | Published: November 19, 2014 10:55 PM