Join us

देशात निश्चित शिक्षण धोरणाचा अभाव - विश्वनाथ महाडेश्वर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 19, 2018 1:03 AM

शिक्षण क्षेत्रात काम करणे सोपे नाही, खूप आव्हाने आहेत. शिक्षणातील व्यथा सर्वसामान्यांना कळतच नाही, असे माझे मत वैयक्तिक मत आहे.

मुंबई : शिक्षण क्षेत्रात काम करणे सोपे नाही, खूप आव्हाने आहेत. शिक्षणातील व्यथा सर्वसामान्यांना कळतच नाही, असे माझे मत वैयक्तिक मत आहे. स्वातंत्र्यानंतर या देशात अनेक धोरणे आली, परंतु दुदैवाने निश्चित असे शैक्षणिक धोरण आलेच नाही. सततच्या परीक्षांमुळे विद्यार्थी, पालक, शिक्षक तणावाखाली असतात. त्यामुळे वाचन आणि लिखाण कौशल्य विकसित होत नाही. तुम्ही कोणत्याही क्षेत्रात कामगिरी करा. मात्र, काम करत असताना तारुण्य, सौंदर्य, संपत्ती आणि सत्ता या ४ गोष्टींचा अहंकार नसावा, असे प्रतिपादन मुंबईचे महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांनी केले.भायखळा पश्चिमेकडील ना. म. जोशी मार्ग येथीलमाजी विद्यार्थी संघाने आयोजित केलेल्या भायखळा म्युनिसिपल सेकंडरी स्कूल (प.)चा सुवर्ण महोत्सव सोहळा रविवारी पार पडला. या कार्यक्रमात ते बोलत होते. विद्यार्थी आणि शिक्षकांच्या शाळेबद्दल आठवणी लिखित स्वरूपात मांडलेल्या ‘गौरव विशेषांक’ स्मरणिकेचे अनावरण महापौरांच्या हस्ते करण्यात आले. या प्रसंगी खासदार अरविंद सावंत, आमदार वारीस पठाण, प्रभाग समिती अध्यक्षा गीता गवळी, नगरसेविका सुरेखा लोखंडे, माजी मुख्याध्यापक अरविंद नेरुरकर, मुख्याध्यापक श्रीमंत सोनावणे, तसेच आजी-माजी शिक्षक व विद्यार्थी उपस्थित होते.या कार्यक्रमात भायखळा शाळेचे सन १९६७ ते २०१७ या ५० वर्षांतील सुमारे १ हजार २०० माजी आणि आजी विद्यार्थी सहभागी झाले होते. या वेळी माजी शिक्षक आणि माजी कर्तृत्ववान विद्यार्थ्यांचा गौरव करण्यात आला. शाळेच्या माजी वयोवृद्ध शिक्षकांना वैद्यकीय साहित्य गौरव स्वरूपात देण्यात आले. सोहळ्यात नाटक, कविता, गाणी आणि नृत्य असे विविध कलागुण विद्यार्थ्यांनी सादर केले.