शिक्षक-शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या वेतनासाठी निधीची कमतरता
By ऑनलाइन लोकमत | Published: April 25, 2020 03:27 PM2020-04-25T15:27:41+5:302020-04-25T15:28:32+5:30
एप्रिल महिन्याचे तरी वेतन वेळेत कसे होणार हा प्रश्न ...
मुंबई : एप्रिल महिन्याचे वेतन देण्याबाबत शासनाने जाहीर केले असले तरी शिक्षक-शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या वेतनासाठी अनुदान कमी पडत असून शासनाने तातडीने अनुदान उपलब्ध करून देण्याची मागणी शालेय शिक्षण विभागाकडे केली जात आहे. भाजपा शिक्षक आघाडीचे मुंबई-कोकण विभागाचे संयोजक अनिल बोरनारे यांनी याबाबत काल २४ एप्रिल रोजी शिक्षण आयुक्त व माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण संचालनालयाचे शिक्षण संचालकांकडे मेल करून ही मागणी केली आहे.
शिक्षण उपसंचालक मुंबई विभागाच्या अंतर्गत मुंबईतील शिक्षण निरीक्षक उत्तर, पश्चिम व दक्षिण विभाग तसेच ठाणे, रायगड व पालघर जिल्ह्याचा समावेश होतो या जिल्ह्यांमध्ये एप्रिल च्या वेतनासाठी केवळ अर्धाच निधी उपलब्ध असून शिक्षक-शिक्षकेतरांचे वेतन कसे होतील असा प्रश्न निर्माण झाला आहे. वेतन अधीक्षक कार्यालयांनी शाळांना एप्रिल महिन्याचे बिले सबमिट करायला सांगितले असून शाळा व कनिष्ठ महाविद्यालये तसेच रात्रशाळांचे देयके जमा होत आहे. त्यामुळे तातडीने निधी उपलब्ध करून घ्यावा अशी मागणी भाजपा शिक्षक आघाडीचे मुंबई विभागाचे अनिल बोरनारे यांनी केली आहे.
---------------------------------------------------
एप्रिल वेतन वेळेत कसे होणार ?
राज्यात निर्माण झालेली आरोग्य विषयक आपत्ती हाताळण्यासाठी राज्यातील शिक्षकांचे वेतन दोन टप्प्यांत देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला होता. त्यामुळे शिक्षकांचे मार्च महिन्याचे वेतन रखडले होते. मात्र एप्रिल महिन्याचे वेतन रखडणार नसल्याचे राज्य शिक्षण विभागाच्या वतीने स्पष्ट केले आहे. वित्त विभागाच्या वतीने जारी करण्यात आलेल्या शासन निर्णयानुसार शिक्षकांचे एप्रिल महिन्याचे वेतन वेळेत देण्याच्या सूचना सर्व शाळा, महाविद्यालयांना देण्यात आल्या आहेत. मात्र निधीची कमतरता असल्यास एप्रिल महिन्याचे वेतन तरी वेळेत कसे होणार हा प्रश्न उपस्थित होत आहे.