तळोजा कारागृहात वैद्यकीय पायाभूत सुविधांचा अभाव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 20, 2021 04:08 AM2021-01-20T04:08:11+5:302021-01-20T04:08:11+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : एल्गार परिषद व शहरी नक्षलवाद प्रकरणी आरोपी असलेले ज्येष्ठ विचारवंत वरावरा राव यांची प्रकृती ...

Lack of medical infrastructure in Taloja Jail | तळोजा कारागृहात वैद्यकीय पायाभूत सुविधांचा अभाव

तळोजा कारागृहात वैद्यकीय पायाभूत सुविधांचा अभाव

Next

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : एल्गार परिषद व शहरी नक्षलवाद प्रकरणी आरोपी असलेले ज्येष्ठ विचारवंत वरावरा राव यांची प्रकृती तात्पुरती ठीक असली, तरी त्यांची रवानगी तळोजा कारागृहात करण्याऐवजी त्यांची जामिनावर सुटका करावी. कारण तळोजा कारागृहात वैद्यकीय पायाभूत सुविधांचा अभाव आहे, अशी माहिती यांच्यातर्फे ज्येष्ठ वकील आनंद ग्रोव्हर यांनी उच्च न्यायालयाला मंगळवारी दिली.

नवी मुंबई येथील तळोजा कारागृहात राव यांच्यासारख्या अंडरट्रायल्सची योग्य ती काळजी घेण्यासाठी पुरेशा वैद्यकीय सुविधा उपलब्ध नसल्याचे ग्रोव्हर यांनी न्या. एस. एस. शिंदे व न्या. मनिष पितळे यांच्या खंडपीठाला सांगितले.

राव यांची आता तब्येत ठीक असली, तरी त्यांच्या तब्येतीवर सतत लक्ष ठेवावे लागेल आणि तशी सुविधा कारागृहात नाही. राव यांची एक किडनी निकामी झाली आहे आणि अन्यही आजार त्यांना आहेत. त्यासाठी त्यांना औषधांच्या २० वेगवेगळ्या गोळ्या देण्यात आल्या आहेत. राव यांना त्यांच्या कुटुंबीयांबरोबर राहून ठीक होऊ द्या, म्हणजे ते खटल्याच्या सुनावणीला उपस्थित राहतील. राव यांची मुलगी आणि जावई डॉक्टर असताना, सरकारी तिजोरी खाली करणे (नानावटी रुग्णालयाचा खर्च) आम्हाला पटत नाही, असे ग्रोव्हर यांनी न्यायालयाला सांगितले.

गेल्या वर्षी राव यांना जेव्हा सरकारी रुग्णालय जे.जे.मध्ये दाखल करण्यात आले, तेव्हा त्यांची नीट काळजी घेण्यात आली नाही. त्यामुळे त्यांना नानावटी रुग्णालयात दाखल करण्यात आले, असे ग्रोव्हर यांनी न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिले.

मात्र, ग्रोव्हर यांचे बोलणे अडवत न्यायालयाने म्हटले की, जे. जे आणि सेंट जॉर्ज रुग्णालये चांगली रुग्णालये आहेत. त्यांच्याकडे उत्तम डॉक्टर्स आहेत, परंतु कोरोनामुळे त्यांच्यावर अधिक भार पडला. माजी मुख्य न्यायाधीशांनीही खासगी रुग्णालयात उपचार घेण्याऐवजी जे.जे. आणि सेंट जॉर्जमध्ये उपचार घेतले आहेत, असे खंडपीठाने म्हटले.

राव यांच्यावर २४ प्रकरणांत गुन्हे नोंदविण्यात आले होते. विशेष म्हणजे सगळ्या प्रकरणांतून त्यांची निर्दोष सुटका झाली. त्यांना या ही खटल्याला उपस्थित राहायचे आहे, पण त्यासाठी त्यांची प्रकृती ठीक असणे आवश्यक आहे, असे ग्रोव्हर यांनी म्हटले. न्यायालयाने राव यांच्या जामीन अर्जावरील पुढील सुनावणी बुधवारी ठेवली आहे.

Web Title: Lack of medical infrastructure in Taloja Jail

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.