Join us

मुंबईकरांनी रेल्वे स्थानकांवर पाणी प्यायचे की नाही? पाणपोईंची परिस्थिती वाईट!

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 24, 2025 12:26 IST

मुंबईच्या सर्वच रेल्वे स्थानकांवर पाणी विक्रीसाठी रेल्वेने मोठी जाहिरात केली आहे. मात्र स्टॉलवरील विक्रेते ग्राहकांशी हुज्जत घालताना दिसत आहेत. प्रवाशांना दिले जाणारे पाणी साधे असते. 

मुंबई

मध्य, हार्बर आणि पश्चिम रेल्वे मार्गावर ५ रुपयांत पाणी, अशी जाहिरात केली जात असली तरी प्रत्यक्षात फार कमी रेल्वे स्थानकांवर गारेगार पाण्याची सेवा उपलब्ध आहे. प्रत्यक्षात तेथेही ग्राहकांना १० रुपये मोजून पाण्याची बाटली घ्यावी लागत आहे. दुसरीकडे ज्यांच्याकडे पाणी विकत घेण्यासाठी पैसे नाहीत, अशांना रेल्वे स्थानकांतील मळकट पाणपोईतील पाणी प्यावे लागत आहे. 

मुंबईच्या सर्वच रेल्वे स्थानकांवर पाणी विक्रीसाठी रेल्वेने मोठी जाहिरात केली आहे. मात्र स्टॉलवरील विक्रेते ग्राहकांशी हुज्जत घालताना दिसत आहेत. प्रवाशांना दिले जाणारे पाणी साधे असते. 

अनेकांना थंड पाणी हवे असल्याने त्यांची चिडचिड होते. तर अनेक रेल्वे स्थानकांच्या फलाटांवर असलेल्या पाणपोईच्या नळाखाली, अवतीभवती प्रवाशांनी गुटखा, मावा, पान खाऊन मारलेल्या पिचकाऱ्यांमुळे परिसर विद्रूप झाला आहे. त्यामुळे येथे पाणी कोण पिणार? असे चित्र आहे. 

इथे पाण्याची शाश्वती नाहीघाटकोपर स्थानकाचा मेकओव्हर सुरू आहे. मात्र पाणपोई तशाच आहेत. मळकट पाणपोईत कधी पाणी असते तर कधी नसते. 

कुर्ल्यात पाणपोई कुठे?कुर्ला रेल्वे स्थानकात तर पाणपोई कुठे आहे. हे शोधावे लागत आहे. या स्थानकात सतत काम सुरू असते. त्यामुळे अडथळ्यांतून वाट काढून पाणी मिळवावे लागते. 

कोरोनानंतर उपक्रम गुंडाळल्यात जमा१. पाणपोईच्या टाक्या धुतल्याची तारीख व पुढील धुण्याच्या तारखेची नोंद हवी. पण कोणत्याच स्थानकांवर तशी नोंद दिसत नाही.

२. नाईलाजास्तव प्रवाशांवर पाणी विकत घेण्याची वेळ येते. प्रवाशांना पाच रुपयांत बाटलीभर थंड पाणी ही संकल्पना रेल्वे प्रशासनाने सुरू केली होती. 

३. तेथे नव्या बाटलीचे शुल्क आकारुन पाणी १० रुपयांत तर स्वत:च्या बाटलीत पाच रुपयांत थंडगार पाणी दिले जात होते. 

४. अनेक ठिकाणी कोरोनानंतर हा उपक्रमच गुंडाळला गेला आहे. याकडे घाटकोपर येथील संदीप पटाडे यांनी लक्ष वेधले.

टॅग्स :मुंबई लोकलमुंबई