श्रीकांत जाधव/मुंबई : कुर्ला येथे टिळक रेल्वे टर्मिनसवर १०-१५ तास विलंबाने गाड्या सुटतात. रेल्वेच्या डब्यात स्वच्छता नसते. पिण्याच्या पाण्याची सोय नाही, अशा अनेक तक्रारी करीत प्रवाशांनी आपल्या अडचणी महाविकास आघाडीच्या उमेदवार वर्षा गायकवाड यांच्याकडे मांडल्या. तेव्हा संतापलेल्या गायकवाड यांनी हा विकास आहे का ?, दहा वर्षात प्रवाशांना सुविधा सुद्धा देता आल्या नाहीत, असा शब्दात मोदी सरकारवर निशाणा साधला.
उत्तर मध्य मुंबईतील महायुतीच्या उमेदवार वर्षा गायकवाड यांनी गुरुवारी कुर्ला टिळक टर्मिनसवर प्रवाशांची भेट घेत संवाद साधला. त्यावेळी प्रवाशांनी रेल्वे टर्मिनस वरील गैरसोयी सांगत आपले प्रश्न मांडले.
त्यावर गायकवाड यांनी केंद्र सरकारवर निशाणा साधला. भाजपा सरकार विकासाची कामे केल्याचा दावा करते पण वस्तुस्थिती वेगळी आहे. वंदे भारत रेल्वे सुरु केलाचा ढोल बडवता परंतु नेहमीच्या रेल्वे वेळेवर सुटत नाहीत, रेल्वे स्टेशनवर प्रवाशांसाठी साध्या सुविधाही नाहीत. हा विकास आहे का? १० वर्षे सत्तेत राहून मोदी सरकारने काय काम केले ?, असा संताप गायकवाड यांनी येथे व्यक्त केला.