नोंदणी क्रमांक नसल्याने विद्यार्थ्यांचे परीक्षा अर्ज पुन्हा अडचणीत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 7, 2021 04:06 AM2021-02-07T04:06:27+5:302021-02-07T04:06:27+5:30
बारावीच्या २४० विद्यार्थ्यांसह पालक चिंतेत ; ‘त्या’ कनिष्ठ महाविद्यालयावर कारवाईची मागणी लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : खासगी काेचिंग क्लास ...
बारावीच्या २४० विद्यार्थ्यांसह पालक चिंतेत ; ‘त्या’ कनिष्ठ महाविद्यालयावर कारवाईची मागणी
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : खासगी काेचिंग क्लास असलेल्या एका कनिष्ठ महाविद्यालयाने कागदपत्रांची पूर्तता न केल्याने त्यांना इंडेक्स राज्य शिक्षण मंडळाकडून इंडेक्स (नोंदणी) नंबर मिळाला नाही आणि त्या महाविद्यालयातील तब्बल २४० विद्यार्थ्यांचे बारावीचे परीक्षा अर्ज स्वीकारले जात नसल्याने त्यांचे शैक्षणिक वर्ष अडचणीत आल्याचा प्रकार समोर आला आहे. ठाणे येथील आर्यन फाउंडेशन कनिष्ठ महाविद्यालयातील हा प्रकार असून तेथील पालक व विद्यार्थ्यांनी आता विद्यार्थी संघटनेकडे धाव घेतली आहे.
ठाणे येथील आर्यन फाउंडेशन लक्ष प्रेप हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालयाला शिक्षण विभागाने मागील काही वर्षांपासून अकरावी प्रवेशाकरिता परवानगी दिलेली आहे. परंतु आता शिक्षण विभागाकडे कागदोपत्री आवश्यक ती पूर्तता न केल्यामुळे सदर महाविद्यालयाला नोंदणी क्रमांक मिळाला नाही. परिणामी या महाविद्यालयातील बारावीच्या विद्यार्थ्यांचे परीक्षा अर्ज राज्य शिक्षण मंडळाकडून स्वीकृत होत नसल्याच्या तक्रारी विद्यार्थ्यांनी युवा सेनेकडे केल्या आहेत. या विद्यार्थ्यांच्या पालकांना आता त्यांच्या पाल्यांचे शैक्षणिक वर्ष वाया जाण्याची भीती वाटत आहे. या पार्श्वभूमीवर युवा सेनेच्या सिनेट सदस्य शिष्टमंडळाने शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांची भेट घेतली. सदर कनिष्ठ महाविद्यालयावर कारवाईची करावी तसेच या विद्यार्थ्यांचे परीक्षा अर्ज स्वीकारण्याचा पर्याय देऊन परीक्षेचा मार्ग मोकळा करावा अशी मागणी केली.
* आवश्यक कार्यवाही करावी
मागील काही वर्षांत कोचिंग क्लासेस आणि त्याच्याशी संलग्न कनिष्ठ महाविद्यालयांचे पेच वाढत असून ऐन परीक्षेवेळी त्यांनी न केलेल्या कागदपत्रांच्या पूर्तता अभावी विद्यार्थ्यांना भुर्दंड सहन करावा लागत आहे. अशा प्रकारच्या इंटिग्रेटेड महाविद्यालयांना चाप लावण्यासाठी शिक्षण विभागाने आवश्यक ती कार्यवाही करून सूचना निर्गमित कराव्यात अशी प्रतिक्रिया सिनेट सदस्य प्रदीप सावत यांनी दिली.
---------------------------------