मुंबई : १५० वर्षे जुनी परंपरा असलेले मुंबई विद्यापीठ म्हणजे विद्यार्थ्यांसाठी शिक्षणाची पंढरीच. २६/११च्या दहशतवादी हल्ल्याला दहा वर्षे होत असल्याच्या पार्श्वभूमीवर विद्यापीठाच्या सुरक्षेचा आढावा घेतला असता, विद्यापीठाची आणि येथील विद्यार्थ्यांची सुरक्षा व्यवस्था अजूनही तकलादू असल्याचे समोर आले आहे. मुख्य प्रवेशद्वारावर केवळ शोभेसाठी उभारण्यात आलेली बॅरिकेड्स, कॅम्पसमधील फक्त महत्त्वाच्या विभागाजवळ नावापुरते उभे असलेले सुरक्षारक्षक, प्रत्यक्षात विनाअडथळा आवाराबाहेरील घटकांची होणारी सर्रास ये-जा, कोणत्याही विभागात मिळणारा मुक्त प्रवेश... असे चित्र मुंबई विद्यापीठाच्या कालिना कॅम्पसमध्ये पाहायला मिळते.
मुंबई विद्यापीठामध्ये साधारणपणे ५००पेक्षा अधिक विषयांसाठी ३ लाखांपेक्षा जास्त विद्यार्थी दरवर्षी प्रवेश घेतात. शैक्षणिक प्रमाणपत्रासाठी, तसेच निकालाशी संबंधित अनेक विषयांसाठी विद्यार्थी आणि पालक परीक्षा भवनमध्ये दररोज हजारोच्या संख्येने येतात. प्रश्नपत्रिका, उत्तरपत्रिकांचे गठ्ठे अशी अनेक संवेदनशील बाबी विद्यापीठाला सांभाळाव्या लागतात. दुरस्थ शिक्षण संस्था, शिक्षणासाठी येथे येणारे परदेशी, तसेचराज्याच्या अनेक जिल्ह्यांतून आलेले विद्यार्थी, त्यांची वसतिगृहे यामुळे हा परिसर गजबजलेला असतो. त्यांची सुरक्षा, तसेच विद्यापीठाच्या कलिना कॅम्पसमधली मोकळी जागा अतिक्रमणापासून वाचविणे, समाजकंटकांना आवारात येण्यापासून रोखणे, आणीबाणीच्या परिस्थितीचा मुकाबला करणेआदी कामांसाठी विद्यापीठाच्या सुरक्षा रक्षकांना नेहमीच सजग राहावे लागते.
विद्यापीठाची फोर्टमधील इमारत हेरिटेज आहे. त्यामुळे तिथेही विद्यापीठाला २४ तास सुरक्षा व्यवस्था तैनात ठेवावी लागते. मात्र, कंत्राटी आणि कायम अशा सुरक्षा रक्षकांच्या गोंधळामुळे विद्यापीठाची सुरक्षा दावणीला लागली आहे.
शैक्षणिकदृष्ट्या अनेक संवेदनशील कामे दररोज हाताळणाऱ्या मुंबई विद्यापीठाच्या आवारातील सुरक्षा रक्षकांची मंजूर पदे कमी करून, संपूर्ण व्यवस्थाच खासगी सुरक्षा कंत्राटदारांच्या हाती सोपविण्याचा प्रयत्न सुरू असल्याचे समोर आले आहे.