सीएसटी स्थानकावरील ‘सेल्फ तिकीट झोन’वर ‘सेल्फ’चा अभाव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 27, 2019 01:11 AM2019-09-27T01:11:34+5:302019-09-27T01:11:37+5:30

चार तिकीट खिडक्या बंद करून मध्य रेल्वेने काय साधले?

Lack of 'Self' on 'Self Ticket Zone' at CST Station | सीएसटी स्थानकावरील ‘सेल्फ तिकीट झोन’वर ‘सेल्फ’चा अभाव

सीएसटी स्थानकावरील ‘सेल्फ तिकीट झोन’वर ‘सेल्फ’चा अभाव

Next

- कुलदीप घायवट 

मुंबई : प्रवाशांनी स्वत:च्या हाताने तिकीट काढण्यासाठी ‘सेल्फ तिकीट झोन’ छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसवर उभारले. प्रवाशांना स्वत: तिकीट काढण्याऐवजी अधिकृत तिकीट दलाल तिकीट देत असल्याने ‘सेल्फ तिकीट झोन’वर ‘सेल्फ’चा अभाव दिसून येतो. मध्य रेल्वेने सेल्फ तिकीट झोन उभारून सीएसएमटीवरील चार तिकीट खिडक्या बंद केल्या. प्रवाशांना तिकीट काढण्यासाठी रांगांना सामोरे जावे लागते. ‘इकडे आड, तिकडे विहीर’ अशी गत आमची झाली असल्याची प्रतिक्रिया प्रवाशांनी दिली.

मध्य रेल्वे प्रशासनाच्या वतीने तिकीट खिडक्यांवरील रांगा कमी करण्यासाठी एटीव्हीएम, जेटीबीएस, यूटीएस अ‍ॅप आणि मोबाइल स्कॅन अशा उपाययोजना केल्या आहेत. प्रवाशांनी ‘सेल्फ’ तिकीट काढण्यासाठी सीएसएमटी स्थानकावर चार सेल्फ तिकीट झोन तयार केले आहेत. या ठिकाणी तिकीट देण्यासाठी अधिकृत तिकीट दलाल बसवून त्यांच्याद्वारे तिकिटाची विक्री केली जाते. प्रवाशांकडे स्मार्ट कार्डचा अभाव असल्याने या दलालांकडून ते तिकीट काढून घेतात. प्रवाशांना तिकीट खिडकीवर आणि सेल्फ तिकीट झोनमध्येही रांगांना सामोरे जावे लागत आहे.

तिकीट खिडक्या बंद करून चार कर्मचाऱ्यांच्या जागा कमी झाल्या; असे करून प्रवाशांचा फायदा होत असेल, तर मध्य रेल्वेच्या योजनेचे स्वागत आहे. चार तिकीट खिडक्या बंद करून आणि सेल्फ तिकीट झोन उभारून मध्य रेल्वेने काय साधले, अशी प्रतिक्रिया नॅशनल रेल्वे मजदूर युनियनचे महामंत्री वेणू नायर यांनी दिली.

लोकमान्य टिळक टर्मिनस, घाटकोपर, विक्रोळी, मुलुंड, ठाणे, डोंबिवली, कल्याण अशा स्थानकांसह एकूण २७ स्थानकांवर एकूण ६८ ‘सेल्फ तिकीट काउंटर’ उभारण्यात येणार आहेत. सीएसएमटीसारखी अवस्था असल्यास अशी उपाययोजना न केलेली चांगले ठरेल, अशी प्रतिक्रिया प्रवाशांनी दिली.

वर्षाला २४ लाखांचा महसूल
सेल्फ तिकीट झोन उभारून या ठिकाणी नामांकित कंपनीचे जाहिरातीकरण करण्यासाठी चार टीव्ही बसविण्यात आले आहेत. त्यांच्याकडून रेल्वेला एका वर्षात साधारण २४ लाखांचा महसूल मिळणार आहे.

Web Title: Lack of 'Self' on 'Self Ticket Zone' at CST Station

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.