जैविक विल्हेवाटीसाठी मुंबईत मिळेना जागा, देवनार कचराभूमीवरील ताण वाढला

By ऑनलाइन लोकमत | Published: September 1, 2020 04:32 AM2020-09-01T04:32:55+5:302020-09-01T04:33:39+5:30

मुंबईत कोरोनाचा प्रसार मार्च महिन्यात सुरू झाल्यापासून मास्क, ग्लोव्हज, औषध सिरिंज, सलाइन बॉटल, युरीन बॅग अशा प्रकारच्या जैविक कचºयाचे प्रमाण देवनार कचराभूमीवर वाढले आहे.

The lack of space for biological disposal in Mumbai has increased the stress on the Deonar landfill | जैविक विल्हेवाटीसाठी मुंबईत मिळेना जागा, देवनार कचराभूमीवरील ताण वाढला

जैविक विल्हेवाटीसाठी मुंबईत मिळेना जागा, देवनार कचराभूमीवरील ताण वाढला

Next

मुंबई : महापालिका रुग्णालय आणि कोविड केअर सेंटरमध्ये जमा होणाऱ्या जैविक कचºयाचे प्रमाण गेल्या तीन महिन्यांत तब्बल १०४ टक्क्यांनी वाढले आहे. जून महिन्यात सरासरी १२ हजार किलोग्रॅम असलेल्या जैविक कचºयाचा भार आॅगस्टमध्ये प्रतिदिन सरासरी २४ हजार ८८० किलोग्रॅमवर पोहोचला आहे. परिणामी, वाहनांची कमतरता, कर्मचाऱ्यांचा तुटवडा आणि देवनार कचराभूमीवर जैविक कचºयासाठी राखीव एक एकर जागेवरील ताण वाढला आहे.
मुंबईत कोरोनाचा प्रसार मार्च महिन्यात सुरू झाल्यापासून मास्क, ग्लोव्हज, औषध सिरिंज, सलाइन बॉटल, युरीन बॅग अशा प्रकारच्या जैविक कचºयाचे प्रमाण देवनार कचराभूमीवर वाढले आहे. केंद्रीय प्रदूषण नियामक मंडळाच्या नियमावलीनुसार रुग्णालय व अन्य आरोग्य यंत्रणेकडून आलेला हा प्लॅस्टिकचा कचरा लाल पिशवीमध्ये वेगळा ठेवावा लागतो. त्यानंतर प्रत्येक पिशवीचे निर्जंतुकीकरण करून त्याची विल्हेवाट अथवा प्रक्रियेसाठी पाठवली जाते. मात्र जैविक कचºयाचे प्रमाण प्रचंड वाढल्यामुळे वाहनांची संख्या आणि हा कचरा ठेवण्यासाठी देवनार कचराभूमीवर जागाही कमी पडू लागली आहे. कोरोनाचा प्रसार सुरू झाल्यानंतर लागण होण्याच्या भीतीने बहुतांशी कर्मचारी काम सोडून गेल्यामुळे मनुष्यबळही कमी असल्याने अडचणीत भर पडली आहे.
देवनार कचराभूमीवर दररोज येणाºया जैविक कचºयाची विल्हेवाट लावण्याची जबाबदारी एसएमएस एन्वोक्लीन प्रायव्हेट लिमिटेड कंपनीवर आहे. रुग्णालयातून जैविक कचरा गोळा करण्यासाठी या कंपनीकडे ६० वाहने आहेत. तसेच मुंबईतील बाधित क्षेत्र, कोविड सेंटरमधून महापालिकेच्या ३५ वाहनांतून पिवळ्या पिशवीतून जैविक कचरा कचराभूमीवर आणला जातो. मात्र आता दररोज जैविक कचºयाचे सरासरी प्रमाण २४ हजार ८८० किलोग्रॅम गेल्यामुळे ताण वाढला आहे. यामुळे अनेक वेळा या कचºयाची योग्य विल्हेवाट लावण्यास विलंब होत असल्याचे सूत्रांकडून समजते.

अशी होते जैविक कचºयाची विल्हेवाट

मास्क, ग्लोव्हज, औषध, सिरिंज, युरीन बॅग, वैद्यकीय कर्मचाºयांनी वापरलेले पीपीई किट आदी जैविक कचरा पिवळ्या पिशवीत एकत्रित करून त्यावर धोक्याचे चिन्ह दर्शवण्यात येते. कोविड केअर सेंटर आणि रुग्णालयातील सर्व जैविक कचरा त्यानंतर देवनार कचराभूमीवर विल्हेवाट लावण्यासाठी नेण्यात येतो. तसेच कोविड केअर सेंटरमधील अन्य वापरलेल्या वस्तू उदा. अन्न आदी देवनार डम्पिंग ग्राउंडमध्ये स्वतंत्र ठिकाणी टाकून त्यावर सोडियम क्लोराइडची फवारणी करण्यात येते.

राष्ट्रीय हरित लवादामार्फत एप्रिल महिन्यात नियुक्त करण्यात आलेल्या समितीने जैविक कचºयाचा वाढलेला भार पेलण्यासाठी उपलब्ध जागेचा विस्तार करण्याचे निर्देश दिले होते. त्यानुसार राज्याचे तत्कालीन मुख्य सचिव अजय मेहता यांनी सर्व महापालिकांना आपल्या क्षेत्रातील कचराभूमीचे आॅडिट करण्याचे आदेश दिले होते.

सध्या जागा, मनुष्यबळ आणि वाहनांची अडचण आहे. देवनार कचराभूमीवर आणखीन तीन एकर जागा मिळावी, अशी मागणी पालिका प्रशासनाकडे केली आहे. पालिकेने एक एकर जागा देण्याची तयारी दाखवली आहे. या जागेचा ताबा मिळताच दहा अतिरिक्त वाहने तत्काळ घेऊन जास्त प्रमाणात येणाºया जैविक कचºयासाठी व्यवस्था करणे शक्य होईल.
- अमित निलावार, संचालक, एसएमएस एन्वोक्लीन
याबाबत संबंधितांशी चर्चा सुरू असून लवकरच हा प्रश्न सोडवण्यात येईल. सर्व रुग्णालय व कोविड केअर सेंटरमधून जैविक कचरा तत्काळ उचलला जावा, याबाबत घनकचरा व्यवस्थापन खात्यातील कर्मचाºयांना ताकीद देण्यात आली आहे. त्यामुळे आता जैविक कचरा रुग्णालयातच पडून राहण्याच्या तक्रारी कमी झाल्या आहेत. त्याचा नियमित आढावा घेतला जात आहे.
- सुरेश काकाणी, अतिरिक्त महापालिका आयुक्त

Web Title: The lack of space for biological disposal in Mumbai has increased the stress on the Deonar landfill

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.