अडीच हजार कोटींचे कर्ज बुडविणारा अटकेत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 14, 2017 05:38 AM2017-08-14T05:38:47+5:302017-08-14T05:38:51+5:30
तब्बल अडीच हजार कोटींचे कर्ज बुडवणारा वरुण इंडस्ट्रिजचा सहप्रवर्तक कैलाश अगरवाल याला, सीबीआयने अटक केली आहे.
मुंबई : तब्बल अडीच हजार कोटींचे कर्ज बुडवणारा वरुण इंडस्ट्रिजचा सहप्रवर्तक कैलाश अगरवाल याला, सीबीआयने अटक केली आहे. अगरवाल दुबईहून भारतात आल्यावर आंतरराष्टÑीय विमानतळावर त्याला जेरबंद करण्यात आले. त्याच्याकडून बँकांतील गैरप्रकार व फरार सहकारी किरण मेहता याच्याबद्दल माहिती घेण्यात येत असल्याचे, सीबीआयचे प्रवक्ते आर. के. गौर यांनी सांगितले.
वरुण इंडस्ट्रिज ही देशातील सर्वाधिक कर्ज बुडविणाºया कंपन्यांपैकी एक असून, गेल्या काही महिन्यांपासून तपास यंत्रणा अगरवालच्या मागावर होती. स्टेनलेस स्टीलच्या उद्योगातील अगरवाल आणि मेहता यांनी इंडियन बँकेची ३३० कोटी रु पयांची फसवणूक केली.
या दोघांनी अन्य बँकांनाही १,५९३ कोटींचा गंडा घातला आहे. सेंट्रल बँक आॅफ इंडिया, सिंडिकेट बँक, स्टेट बँक आॅफ इंडिया, युनायटेड बँक आॅफ इंडिया, बँक आॅफ इंडिया, बँक आॅफ बडोदा, यूको बँक, एआरसीआयएल (आयडीबीआय बँक) आणि अलाहाबाद बँकांकडून २००७ ते २०१२ या कालावधीत हे कर्ज उचलेले.
त्याशिवाय खासगी सावकारांकडूनही अगरवालने १०० कोटींचे कर्ज उचलले होते. अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) अवैध मिळकत, कर्जबुडवेगिरी व मनी लॉन्ड्रिंगप्रकरणी त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.