उर्दू शिक्षकांची कमतरता

By admin | Published: June 27, 2015 10:54 PM2015-06-27T22:54:13+5:302015-06-27T22:54:13+5:30

महाड तालुक्यात गेली अनेक वर्षे जिल्हा परिषदेच्या उर्दू शाळांमध्ये शिक्षकांची कमतरता भासत आहे. वर्षानुवर्षे पदे रिक्त राहत असल्याने विद्यार्थ्यांच्या शिक्षणाचा

Lack of Urdu teachers | उर्दू शिक्षकांची कमतरता

उर्दू शिक्षकांची कमतरता

Next

सिकंदर अनवारे, दासगाव
महाड तालुक्यात गेली अनेक वर्षे जिल्हा परिषदेच्या उर्दू शाळांमध्ये शिक्षकांची कमतरता भासत आहे. वर्षानुवर्षे पदे रिक्त राहत असल्याने विद्यार्थ्यांच्या शिक्षणाचा मात्र चांगलाच बोऱ्या वाजत आहे. या समस्येकडे जिल्हा परिषद कायम कानाडोळा करत असल्याने उपलब्ध शिक्षकांतून तडजोड करत महाड तालुक्यात उर्दू शाळा चालवल्या जात आहेत.
महाड तालुक्यात रायगड जिल्हा परिषदेमार्फत ३३ उर्दू शाळा चालवल्या जात आहेत. या ३३ उर्दू शाळांमध्ये गेली काही वर्षे रिक्त पदांची संख्या वाढू लागली आहे. तालुक्यातील अनेक गावांतून ग्रामस्थांनी विरोध दर्शवत शाळा बंदचा इशारा देखील दिला होता. यापैकी गतवर्षी दाभेळ ग्रामस्थांनी शाळेतील मुलांनाच महाड पंचायत समितीसमोर आणून बसवले होते. यानंतर या शाळेवर दुसऱ्या शाळेचा एक शिक्षक आणून बसवला. उर्दू शिक्षकांच्या कमतरतेमुळे उपलब्ध शिक्षकांमधूनच तडजोड करण्याचे काम गटशिक्षण अधिकारी करत आहेत. या समस्येवर अनेकवेळा आमसभेत देखील आवाज उठला आहे. यावर्षी देखील हा मुद्दा आमसभेत चर्चेला आला. प्रतिवर्षी हा मुद्दा चर्चेला येऊन देखील त्यावर ठोस उपाय होत नसल्याने पालकवर्गात नाराजीचे वातावरण आहे. महाड तालुक्यात सद्यस्थितीत ३३ उर्दू शाळांमध्ये केवळ ६० उपशिक्षक कार्यरत तर केवळ चारच मुख्याध्यापक आहेत. काही उर्दू शाळा या केंद्रशाळा तर काही सातवीपर्यंत असलेल्या शाळा आहेत. या केंद्रशाळांच्या इयत्ता सातवीपर्यंत देखील एक ते दोनच शिक्षक शिकवण्याचे काम करत आहेत. महाड तालुक्यात एकही पदवीधर शिक्षक उपलब्ध नाही, त्याचप्रमाणे अंशकालीन शिक्षक आजतागायत उपलब्ध झालेला नाही. तालुक्यात १७ पदवीधर तर ११ उपशिक्षकांची गरज असल्याची माहिती शिक्षण विभागाकडून देण्यात आली आहे. उर्दू शिक्षकांची कमतरता ही चिंतेची बाब असून तालुक्यात कांबळे तर्फे बिरवाडी, वराठी, नडगाव, साकडी, वीर, टोळ बु., साईलनगर या शाळांनी गेली अनेक वर्षे विद्यार्थी पटसंख्येत एक अंकी आकडा पार केलेला नाही. केवळ भेमजाई या शाळेचा पट शंभराच्या बाहेर आहे. तालुक्यातील ग्रामीण भागात असलेल्या सर्वसामान्य पालकांना शासनाच्या उर्दू शाळांशिवाय पर्याय नसतो. खाजगी शाळांचा खर्च या पालकांना परवडणारा नसल्याने पर्यायाने गावातच उर्दू शिक्षण घेणे योग्य ठरते. मात्र शिक्षक कमतरता असल्याने या शिक्षकांची देखील चांगलीच परवड होते. जिल्हा प्रशासनाच्या हलगर्जीपणाचा फटका मात्र उर्दू शाळांत शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना बसत आहे.

- महाड तालुक्यात उर्दू, मराठी भाषांच्या शिक्षणाऐवजी इंग्रजी शिक्षणाकडे पालकांची वाढलेली मानसिकता पटसंख्या गळतीचे कारण असले तरी शासनाच्या शिक्षण विभागाकडून सोयी-सुविधांवर करण्यात येणाऱ्या अफाट खर्चाबरोबर शासनाने शिक्षकसंख्या वाढवणे गरजेचे असल्याचे मत पालकांतून व्यक्त होत आहे. या समस्येबाबत तालुक्यातील लोकप्रतिनिधी देखील दुर्लक्ष करीत आहेत.

या शैक्षणिक वर्षात जून महिन्याच्या शेवटपर्यंत रिक्त पदे भरली गेली नाही तर महाड पोलादपूर मुस्लीम एकता समितीच्या वतीने शिक्षण विभागाला रीतसर निवेदन दिले जाईल. या निवेदनानंतर देखील कोणताच निर्णय झाला नाही तर आंदोलन करण्यात येईल.
- मन्सूर देशमुख,
सचिव, महाड पोलादपूर मुस्लीम एकता समिती.

उर्दू शाळांमध्ये पदवीधर शिक्षकांची पदे अधिक रिक्त आहेत. याबाबत जिल्हास्तरावरून समायोजन न झाल्याने ही पदे रिक्त आहेत. नियुक्त्या होताच ही पदे भरली जातील.
- एस. एस. महामुनी,
गटशिक्षणाधिकारी, पंचायत समिती महाड.

Web Title: Lack of Urdu teachers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.