तपासात इच्छाशक्तीचा अभाव
By admin | Published: March 20, 2015 02:06 AM2015-03-20T02:06:20+5:302015-03-20T02:06:20+5:30
हत्येला एक महिना उलटूनही सरकारकडून केवळ थातूरमातूर उत्तरे मिळत असून, तपास योग्य दिशेने होत नसल्याचा आरोप पानसरे कुटुंबीयांनी गुरुवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीनंतर केला.
मुंबई : ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते कॉम्रेड गोविंद पानसरेंच्या हत्येला एक महिना उलटूनही सरकारकडून केवळ थातूरमातूर उत्तरे मिळत असून, तपास योग्य दिशेने होत नसल्याचा आरोप पानसरे कुटुंबीयांनी गुरुवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीनंतर केला. ज्या धर्मांध शक्तींनी कॉ. पानसरे यांना लक्ष्य केले त्या दिशेने तपास होताना दिसत नाही. त्यामुळे तपासाबाबत इच्छाशक्तीचा अभाव असल्याची खंत पानसरे यांची मुलगी स्मिता यांनी या वेळी व्यक्त केली. याप्रसंगी कॉमे्रड प्रकाश रेड्डी, राष्ट्रवादीच्या आ. विद्या चव्हाण, शेकापचे आ. जयंत पाटील आदी उपस्थित होते़
पानसरेंच्या हत्येनंतर राज्यात मोठ्या प्रमाणात संताप व्यक्त होत असतानाही मुख्यमंत्र्यांनी अथवा भाजपाच्या कॅबिनेट मंत्र्यांनी आपल्याला भेटण्याची तसदीही घेतली नाही. मात्र हा तपास योग्य दिशेने व्हावा, यासाठी मुख्यमंत्र्यांची भेट घेतल्याचे स्मिता यांनी सांगितले. या भेटीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रकरणाचा तपास योग्य दिशेने
सुरू असल्याचे सांगून दीडशे
जणांची चौकशी झाल्याचे सांगितले. मात्र ज्या धर्मांध शक्तींबाबतची चौकशी होणे आवश्यक असताना त्या दिशेने तपास यंत्रणा काहीही करत नाही, यावर मुख्यमंत्र्यांनी कोणतेही भाष्य केले नसल्याचे स्मिता यांनी सांगितले.
कामगार नेते दत्ता सामंत यांचीही अशीच हत्या झाली होती. त्यांचे मारेकरी सापडले़ परंतु सूत्रधार सापडले नाहीत. या पार्श्वभूमीवर कॉ. पानसरे यांच्या मारेकऱ्यांसोबतच मुख्य सूत्रधार शोधायला हवेत. परंतु या भाजपा सरकारची मानसिकता लक्षात घेता त्यादृष्टीने तपास होण्याची शक्यता नसल्याचा आरोपही स्मिता पानसरे यांनी केला. (प्रतिनिधी)