महिलांनो! पुरस्कारासाठी अर्ज केला का?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 23, 2023 12:06 PM2023-05-23T12:06:09+5:302023-05-23T12:06:18+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : उन्हाळी सुटीसाठी सध्या चाकरमानी गावात आहेत. त्यापैकी अनेक जण वर्षभर गावासाठी सामाजिक कार्य करीत ...
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : उन्हाळी सुटीसाठी सध्या चाकरमानी गावात आहेत. त्यापैकी अनेक जण वर्षभर गावासाठी सामाजिक कार्य करीत असतात. तेव्हा गावात महिला व बाल विकासासाठी उत्कृष्ट कार्य असलेल्या महिलांना पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीनिमित्त ३१ मे रोजी पुरस्कार देऊन गौरविण्यात येणार आहे. अशा कर्तबगार महिलांना प्रोत्साहन मिळावे म्हणून ग्रामपंचायत कार्यालयात ‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर महिला सन्मान पुरस्कार’ देऊन सन्मानित करण्यात येणार आहे. त्यासाठी अर्ज मागविण्यात आले आहेत.
प्रत्येक गावांत दोन महिलांचा गौरव
या पुरस्कारासाठी प्रत्येक गावात दोन कर्तबगार महिलांना ‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर महिला सन्मान’ पुरस्कार देऊन गौरविण्यात येणार आहे.
पुरस्काराचे स्वरूप काय?
सन्मानपत्र, सन्मानचिन्ह, शाल व श्रीफळ, रोख रक्कम ५०० रुपये, असे या पुरस्काराचे स्वरूप आहे.
अर्ज कुठे, कधीपर्यंत करायचा?
इच्छुक महिलांनी स्वतःची वैयक्तिक माहिती व केलेल्या कार्याच्या तपशिलासह संबंधित ग्रामपंचायतीकडे अर्ज करावा.
निकष काय?
महिला व बालविकास क्षेत्रात उल्लेखनीय कार्य असावे. ग्रामपंचायतीतील/ गट ग्रामपंचायतीत रहिवासी असावी. कार्यक्षेत्र गाव असावे. किमान तीन वर्षे कार्य केलेले असावे. सात वर्षांनंतर पुन्हा अर्ज करता येईल. प्रश्नांबाबत संवेदनशीलता असावी. सक्रिय सहभाग असावा.
महिला अत्याचारामध्ये समाविष्ट नसावी. बालविवाह प्रतिबंध, हुंडा निर्मूलन, लिंगचिकित्सा प्रतिबंध, घरगुती हिंसा प्रतिबंध, महिला सक्षमीकरण, महिला स्वयंसाहाय्यता बचत गट, आरोग्य, साक्षरता, मुलींच्या शिक्षणासाठी पुढाकार यासारख्या कार्यामध्ये उत्स्फूर्तपणे पुढाकार घेतलेला असावा.
निवड समितीत कोण असणार?
निवड समितीत सरपंचांच्या अध्यक्षतेखाली ग्रामसेवक, पोलिस पाटील, मुख्याध्यापक, अंगणवाडी सेविका, आशा वर्कर, बालविकास प्रकल्प, संरक्षण अधिकारी, जिल्हास्तरावर कार्यक्रम अधिकारी, जिल्हा महिला बालविकास अधिकारी, आर्थिक विकास महामंडळाचे जिल्हा समन्वयक अधिकारी असणार आहेत.