महिलांनो, व्यायामशाळाच तुमच्याकडे येणार धावत

By ऑनलाइन लोकमत | Published: November 21, 2023 11:08 AM2023-11-21T11:08:35+5:302023-11-21T11:08:46+5:30

बसमध्येच जिमची रचना, महिनाभरात हाेणार अंमलबजावणी

Ladies, the gym will come running to you | महिलांनो, व्यायामशाळाच तुमच्याकडे येणार धावत

महिलांनो, व्यायामशाळाच तुमच्याकडे येणार धावत

लोकमत न्यूज नेटवर्क 
मुंबई : नोकरीसाठी होणारी धावपळ, ताणतणाव, बैठे कामाच्या पद्धती, व्यायामाकडे होणारे दुर्लक्ष, आदी कारणांमुळे महिलांमध्ये आरोग्यविषयक समस्या वाढू लागल्या आहेत. ही बाब ध्यानात घेऊन मुंबई उपनगरचे पालकमंत्री मंगलप्रभात लोढा यांच्या संकल्पनेतून महिलांसाठी मुंबईत येत्या महिनाभरात ठिकठिकाणी फिरत्या व्यायामशाळा (जिम ऑन व्हील) दिसणार आहेत. यासाठीची प्रक्रिया अंतिम टप्प्यात असल्याची माहिती पश्चिम उपनगराचे पालकमंत्री मंगलप्रभात लोढा यांनी दिली. 

मुंबईचे जीवन म्हणजे धकाधकीचे असून, कामासोबत शरीर व मानसिक फिटनेस राखणे आव्हान आहे. विशेष म्हणजे  कामावर जाणाऱ्या तसेच गरीब घरातील महिलांचे फिटनेसकडे सर्रास दुर्लक्ष होते. सोबत बदलत्या जीवनशैलीमुळे उद्भवणाऱ्या आजाराबाबत अधिक सतर्कता बाळगण्याची गरज आहे. अशा परिस्थितीत महिलांना घराजवळच, सोयीच्या परिसरात फिटनेसची सुविधा प्राप्त व्हावी, त्यांना माहिती व्हावी म्हणून ही संकल्पना राबवली जाणार आहे. घरोघरी फिटनेस उपक्रम घेणे, व्यायामाबाबत जागरूकता आणण्यासह निरोगी जीवन जगण्यासाठी प्रोत्साहित करण्याकरिता ही नावीन्यपूर्ण योजना आखण्यात आली आहे.

 अशी असेल व्यायामशाळा 
  एका बसमध्ये व्यायामाचे साहित्य उपलब्ध करून दिले जाईल. त्यात बसचालक, ट्रेनर व इतर एका व्यक्तीचा समावेश असेल. 
  उपनगरातील प्रत्येक भागात नेमून दिलेल्या वेळेत जाऊन त्या भागातील महिलांना फिटनेसची माहिती देऊन त्यांना शिकवले जाईल. अशा प्रकारची एक फिरती व्यायामशाळा खरेदी करण्यासाठी उपनगर जिल्हा नियोजन विभागाकडून निधी उपलब्ध झाला आहे. 
 त्यानुसार महापालिकेच्या वतीने फिरत्या व्यायामशाळेची बांधणी बस सांगाडा घेऊन त्यात केली जाणार आहे. 

काय आहे योजना
मोठ्या आकाराच्या बसमध्ये या जिमची रचना केली जाणार आहे. प्रायोगिक टप्प्यासाठी मुंबई उपनगर जिल्ह्याची निवड करण्यात आली असून, एका फिरत्या व्यायामशाळेची सुविधा उपलब्ध करून दिली जाणार आहे. या व्यायामशाळेला मिळणारा प्रतिसाद पाहून अन्य ठिकाणी अशाप्रकारच्या सुविधा उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेतला जाईल. यासाठी सुमारे ७५ लाख रुपयांचा खर्च अपेक्षित असून, पुढील तीन वर्षे देखभाल दुरुस्तीकरिता १ कोटी ४२ लाख रुपये इतका खर्च केला जाणार आहे. 

जिम ऑन व्हील 
अर्थात फिरत्या व्यायामशाळेसाठी सध्या  ‘बी द चेंज’ ही कंपनी पात्र ठरली आहे. याद्वारे महिलांना फिटनेससाठी माेलाची मदत हाेणार आहे. 

महिला सक्षमीकरण, सबलीकरण आणि सशक्तीकरणाला सरकारचे विशेष प्राधान्य आहे. त्याचाच एक भाग म्हणून मुंबईकर महिलांना ‘जिम ऑन व्हील’ उपलब्ध करून दिली जाणार आहे. व्यापक पातळीवर ही संकल्पना राबविण्याचा आमचा मानस असून, येत्या महिनाभरात अंमलबजावणी शहरातील विविध भागात सुरू होईल. 
- मंगलप्रभात लोढा, पालकमंत्री, मुंबई उपनगर

Web Title: Ladies, the gym will come running to you

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Mumbaiमुंबई