महायुती सरकारची लाडकी बहिण योजना प्रचंड चर्चेत असतानाच आता दहीहंडीच्या पार्श्वभूमीवर लाडक्या बहिणींचा लाडका गोविंदा सराव शिबिराचे आयोजन सांताक्रुझ पश्चिम इथल्या धर्मवीर संभाजी क्रीडांगण मैदानात करण्यात आले होते. जवळपास शंभरहून अधिक गोविंदा पथकांनी यात सहभाग घेतला. युवासेना सरचिटणीस आणि शिवसेना सोशल मीडिया राज्यप्रमुख राहुल कनाल यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली या सराव शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. लाखोंच्या घरात परितोषकांची रक्कम यासाठी ठेवण्यात आली होती. चार थर लावणाऱ्या गोविंदा पथकाला दोन हजार तर आठ थर लावणाऱ्या गोविंदाला पंचवीस हजार रुपये रोख रक्कम देऊन सन्मान करण्यात आला. लाडक्या बहिणींचा लाडका गोविंदा सराव शिबिरात राजकीय नेत्यांनीही हजेरी लावली. वांद्रे पश्चिमचे आमदार आशिष शेलार, कल्याणचे खासदार श्रीकांत शिंदे उपस्थित होते. यासोबतच रॅपर एम.सी स्टॅन कार्यक्रमाचे मुख्य आकर्षण ठरला एम.सी स्टॅनला पाहताच एकच जल्लोष तरुणांनी केला. त्याच्यासोबत सेल्फी घेण्यासाठी गर्दीही केली. तर खासदार श्रीकांत शिंदे आणि आमदार आशिष शेलार यांनी २०२४ विधानसभा विजयाचा संकल्प करत विजयाची हंडी फोडली.
"लाडक्या बहिणींप्रमाणेच आम्हाला गोविंदाही लाडका आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्त्वातील सरकार सणांनाही महत्व देऊन संस्कृती जपत आहे. आज लाखो गोविंदांचा विमा देखील सरकारने काढला आहे. तसंच दहीहंडीला प्रो-गोविंदाच्या पार्श्वभूमीवर एक वेगळी ओळख निर्माण करुन दिली आहे"- राहुल कनाल, शिवसेना सोशल मीडिया राज्यप्रमुख