Join us

उषा खन्ना यांना लाडली जीवनगौरव पुरस्कार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 09, 2020 4:05 AM

मुंबई : ‘पॉप्युलेशन फर्स्ट’ या स्वयंसेवी संस्थेतर्फे दिल्या जाणाऱ्या ‘लाडली जीवनगौरव पुरस्कारा’साठी ज्येष्ठ संगीतकार उषा खन्ना यांची निवड करण्यात ...

मुंबई : ‘पॉप्युलेशन फर्स्ट’ या स्वयंसेवी संस्थेतर्फे दिल्या जाणाऱ्या ‘लाडली जीवनगौरव पुरस्कारा’साठी ज्येष्ठ संगीतकार उषा खन्ना यांची निवड करण्यात आली आहे. पुरुष समानता, महिला हक्क, लिंगभेदाबाबत संवेदनाक्षम बातमीदारी अशा विषयांवर कार्यरत माध्यम प्रतिनिधी, वेबसीरिज, नाटक, पुस्तके, फिल्मच्या माध्यमातून या मुद्द्यांविषयी जनजागृती करणाऱ्या प्रतिनिधींना संस्थेतर्फे ‘लाडली मीडिया अँड ॲडव्हर्टायझिंग ॲवॉर्ड फॉर जेंडर सेन्सिटिव्हिटी’ने सन्मानित करण्यात येते. कोविडमुळे या पुरस्कार सोहळ्याचे आयोजन १५ डिसेंबर रोजी संस्थेच्या यूट्युब पेजवर करण्यात आले आहे.

‘वुमन बिहाईंड द सिन’ हा पुरस्कार ‘शोले’फेम महिला स्टंट कलाकार रेश्मा पठाण यांना तर ‘थिएटर’ विभागासाठीचा पुरस्कार महाबानू मोदी कोतवाल आणि पुअर बॉक्स प्रॉडक्शन यांच्या ‘व्हजायना मोनोलॉग्स’ या नाटकाला जाहीर झाला आहे. त्याचसोबत, प्रिंट आणि इलेक्ट्रॉनिक माध्यमातील ११ प्रतिनिधी आणि ६ जाहिरातींना विविध विभागात राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे.

तसेच, लेखिका लिसा रे यांचे ‘क्लोज टू द बोन’ पुस्तक, मनरीत सोढी सोमेश्वर यांचे ‘रेडिअन्स ऑफ अ थाऊसंड सन्स’ हे पुस्तक, तर सुप्रीता दास यांचे ‘फ्री हिट’ ही पुस्तकेही या पुरस्काराची मानकरी ठरली आहेत. ‘एक्सपेरिमेंटल थिएटर फाउंडेशनच्या’ मंजुल भारद्वाज, गीतांजली राव दिग्दर्शित ‘बॉंबे रोझ’ हा भारतीय ॲनिमेटेड चित्रपट आणि ‘आर्टिकल १५’ हा हिंदी चित्रपट पुरस्कार विजेता ठरला आहे. डॉक्युमेंट्री विभागात ‘होली राईट्स’ला तर, ‘वेब सीरिज’ विभागात ‘मेड इन हेवन’ला पुरस्कार आहे. ‘फिचर फिल्म्स’ विभागात ‘सोनी’ फिल्मला पुरस्कार देण्यात येणार आहे.

कोट

पुरस्कारप्राप्त विजेत्यांनी लेखन, नाटक, पुस्तके, चित्रपट अशा अनेक माध्यमांद्वारे लिंगभेदाबाबत संवेदनाक्षम पद्धतीने कथन केले आहे. ही खरेच कौतुकास्पद बाब आहे. जाती, वर्ग आणि लिंग यांचे उत्तमरीत्या विश्लेषण करून स्त्री-पुरुष समानतेवर आधारित समाज निर्माण करण्यासाठी ही सर्वसमावेशक माध्यमे सदैव तत्पर असल्याचे दिसते.

- डॉ. ए. एल. शारदा, पॉप्युलेशन फर्स्टच्या संचालिका