डेंग्यूमुळे तरुणीचा मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 13, 2019 06:49 AM2019-10-13T06:49:52+5:302019-10-13T06:49:56+5:30
सोपाऱ्यातील भंडारआळी, नवायत मोहल्ला, खारकंडी मोहल्ला या परिसरात डेंग्युचे रुग्ण मोठ्या संख्येने सापडून आले आहेत. येथील पाटील, डबरे, मालीम कुटुंबातील सदस्यांना डेंग्युची लागण झाली होती आणि ती अद्याप पर्यंत आहे.
नालासोपारा (प्रतिनिधी) :- पश्चिमेकडील सोपारा गावातील अनेक रहिवाशांना डेंग्युची लागण झाली असून, त्यापैकी एका तरुणीचा मृत्यू झाल्याचे उघडकीस आले आहे. या घटनेने परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे.
सोपाऱ्यातील भंडारआळी, नवायत मोहल्ला, खारकंडी मोहल्ला या परिसरात डेंग्युचे रुग्ण मोठ्या संख्येने सापडून आले आहेत. येथील पाटील, डबरे, मालीम कुटुंबातील सदस्यांना डेंग्युची लागण झाली होती आणि ती अद्याप पर्यंत आहे. लहानांपासून वृद्धांपर्यंत अनेकांना डेंग्यूची लागण झाली आहे. त्यात माजी नगरसेविका अपर्णा पाटील आणि त्यांचा मुलगा जयेश यांचाही समावेश आहे. हे दोघेही या आजारातून बरे झाले मात्र शबनम मालीम त्यांच्याप्रमाणे सुदैवी ठरली नाही. डेंग्यू ने तिचा बळी घेतला. 4 ऑक्टोबरला तिचा 19 वा वाढदिवस होता. कुटूंबिय, होणारा पती यांच्यासह तिने तो आनंदात साजरा केला. दुसऱ्या दिवशी तिला ताप आल्यामुळे स्थानिक डॉक्टरांकडून औषध आणण्यात आले. मात्र, तिसऱ्या दिवशी दुपारी चक्कर येवून तिच्या तोंडातून फेस आल्यामुळे घरच्यांनी तिला पाटील हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी नेले. त्याठिकाणी अतिदक्षता विभाग नसल्याने त्यांनी तिला दुसरीकडे नेण्यास सांगितले. त्यानुसार तिला रिध्दी विनायक हॉस्पीटलमध्ये नेण्यात आले. तेथे उपचार सुरु असतानाच तीचा मृत्यू झाला आहे. तिला डेंग्युची लागण झाल्याचे निदान डॉक्टरांनी केल्याचे कुटुंबियांनी सांगितले.
वरील परिसरात डेंग्युचे रुग्ण मोठ्या संख्येने सापडू लागल्यामुळे येथील नागरिक भयभित झाले आहेत. महानगरपालिकेने युध्द पातळीवर उपाययोजन कराव्यात अशी मागणी माजी नगरसेवक हर्षद राऊत यांनी आयुक्तांकडे केली आहे. त्यानुसार पालिकेच्या मनिषा माळी आणि प्रियांका पागडे या आरोग्य सेविकांनी डेंग्यु आणि मलेरियाबाबत सोपारा गावात जनजागृती करण्यास सुरुवात केली आहे. मात्र ग्रामस्थांकडून सहकार्य मिळत नसल्याची खंत त्यांनी व्यक्त केली आहे. घरात बादल्या, पिंप तसेच घराबाहेर करवंटया, डबे, छोटी डबकी यात साचलेले पाणी ठेवू नका असे आवाहन केल्यानंतरही ही सावधनता ग्रामस्थाकडून बाळगली जात नसल्याचे त्यांनी सांगितले आहे.
डेंगू आणि मलेरियाची जुने पत्रकांचे वाटप.....
दरम्यान पालिकेकडून डेंग्यु आणि मलेरियाबाबत जनजागृती करण्यासाठी जुनीच पत्रके वाटली जात आहे. त्यावर निवृत्त झालेले आयुक्त गोविंद राठोड, माजी महापौर नारायण मानकर आणि उपमहापौर रुपेश जाधव यांचीच नावे असल्याचे हर्षद राऊत यांनी महानगरपालिकेच्या निदर्शनास आणून दिले आहे.