Join us

लग्नसराई, लोकलमुळे काेराेना वाढल्याचा निष्कर्ष

By ऑनलाइन लोकमत | Published: March 08, 2021 6:02 AM

केंद्रीय पथकाच्या निरीक्षणात आरोग्य यंत्रणा सुस्तावल्याचा ठपका

लोकमत न्यूज नेटवर्कनवी दिल्ली : कोरोनाविषयी लोकांच्या मनात नसलेली भीती, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या नुकत्याच झालेल्या निवडणुका तसेच लोकलसह सार्वजनिक वाहतूक सेवेतून लोकांचा वाढलेला प्रवास या गोष्टींमुळे महाराष्ट्रात पुन्हा कोरोना संसर्ग मोठ्या प्रमाणावर फैलावत आहे, असा अहवाल केंद्र सरकारने पाठविलेल्या तज्ज्ञांच्या पथकाने आपल्या दौऱ्यानंतर काढला आहे. याच वेळी त्यांनी कोरोना चाचण्या करणारी आरोग्य यंत्रणा सुस्तावल्याचा ठपकाही ठेवला आहे.

केंद्रीय आरोग्य मंत्रालयाचे सहसचिव निपुण विनायक यांच्यासह तीन जणांच्या तज्ज्ञ पथकाने १ व २ मार्च रोजी महाराष्ट्राचा दौरा करून कोरोना स्थितीची पाहणी केली. या समितीने अहवालात म्हटले आहे की, सध्या लग्नसराईचे दिवस, सभासमारंभ सुरू आहेत. अशा गोष्टींतून महाराष्ट्रात पुन्हा कोरोना साथीचा मोठ्या प्रमाणावर फैलाव होत आहे. त्यामुळे महाराष्ट्र सरकारने कोरोना चाचण्यांची संख्या वाढविणे, रुग्णांचा वेगाने शोध घेणे, नियमांची अंमलबजावणी करणे यापुढेही सुरू ठेवावे अशा सूचना या अहवालात केल्या आहेत. महाराष्ट्रात कोरोना चाचण्यांसाठी लोक स्वत:हून पुढे येण्याचे प्रमाणही कमी आहे. सप्टेंबरनंतर कोरोना साथीचा जोर कमी झाल्याने आरोग्य यंत्रणाही सुस्तावली आहे. याचा परिणाम म्हणून आता महाराष्ट्रात कोरोनाचा फैलाव वाढला आहे.  

पथकाचे म्हणणे...n कोरोनाचा मोठा फैलाव झालेल्या भागांत प्रतिबंधक नियमांचे नीट पालन होण्यावर लक्ष केंद्रित करावेn काँटॅक्ट ट्रेसिंगवर भर द्यावा. लसीकरण सुरू ठेवावे 

औरंगाबाद जिल्ह्यात अंशत: लॉकडाऊन औरंगाबाद शहर व जिल्ह्यात कोरोनाच्या रुग्णसंख्येत गेल्या काही दिवसांपासून सातत्याने वाढ होत आहे.  या पार्श्वभूमीवर औरंगाबाद जिल्ह्यात ११ मार्च ते ४ एप्रिल या कालावधीत अंशत: लॉकडाऊन लागू करण्याचा निर्णय जिल्हाधिकाऱ्यांनी जाहीर केला.         

टॅग्स :कोरोना वायरस बातम्यामुंबईलोकल