मुंबई - मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या निवासस्थानासमोर हनुमान चालिसा पठण करण्याचे आव्हान देणाऱ्या आणि सध्या न्यायालयीन कोठडीत असलेल्या राणा दाम्पत्याविरोधात शिवसेना नेते संजय राऊत कमालीचे आक्रमक झालेले आहेत. दरम्यान, संजय राऊत यांनी राणा दाम्पत्याचे दाऊद इब्राहीमचा हस्तक असलेल्या युसूफ लकडावालाशी संबंध असून, त्यांनी त्याच्याकडून ८० लाख रुपयांचे कर्ज घेतल्याचा आरोप केला होता. मात्र याच युसूफ लकडावालासोबत महाविकास आघाडी सरकारचे निर्माते आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख शरद पवार यांचे तसेच इतर काही नेत्यांचे फोटो व्हायरल झाल्याने राऊत बॅकफूटवर आल्याचे चित्र निर्माण झाले होते.
मात्र आता संजय राऊत यांनी शरद पवार तसेच इतर काही नेत्यांचे युसूफ लकडावालासोबत व्हायरल झालेल्या फोटोंवरून भाजपाला प्रत्युत्तर दिले आहे. युसूफ लकडावालासोबत कुठल्या नेत्यांचे फोटो समोर आले हे महत्त्वाचे नसून, त्याच्यासोबत कुणी व्यवहार केला. हे महत्त्वाचे आहे. त्याची चौकशी झाली पाहिजे असे म्हटले आहे.
आज संजय राऊत यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधताच त्यांना शरद पवार तसेच अन्य नेत्यांच्या युसूफ लकडावालासोबत व्हायरल झालेल्या फोटोंबाबत त्यांच्याकडे विचारणा करण्यात आली. त्यावर संजय राऊत म्हणाले की, असे फोटो असतीलही. कुणासोबत कुणाचे फोटो आहेत, हा प्रश्न महत्त्वाचा नाही. तर संबंधित व्यक्तीसोबत ज्याला २०० कोटींच्या मनी लाँड्रिंग प्रकरणात ईडीने अटक केली होती. त्याच्यासोबत कुणाचे आर्थिक व्यवहार होते आणि त्यांना ईडीने चौकशीसाठी का बोलावले नाही, हा प्रश्न आहे, असे संजय राऊत यांनी म्हटले आहे.