Join us  

मुंबईला पाणीपुरवठा करणारे तलाव ५० टक्के भरले; तलाव क्षेत्रात समाधानकारक पाऊस

By सचिन लुंगसे | Published: July 12, 2022 11:43 AM

मुंबई महापालिकेच्या वतीने ठाणे, भिवंडी महानगरपालिका व इतर गावांना पाणीपुरवठा केला जातो.

मुंबई -  मुंबईसह आसपासच्या परिसराला पाणीपुरवठा करणाऱ्या मुंबई महापालिकेच्या सात तलाव क्षेत्रात दमदार पाऊस हजेरी लावत आहे. त्यामुळे मुंबई महापालिकेच्या सातही तलावांत आज अखेर ५० टक्के एवढा जलसाठा निर्माण झाला आहे.

मुंबई महापालिकेच्या वतीने ठाणे, भिवंडी महानगरपालिका व इतर गावांना पाणीपुरवठा केला जातो. पावसाळ्यामध्ये जून महिन्यात मुंबईस पाणीपुरवठा करणाऱया तलाव क्षेत्रात अपूर्ण पर्जन्यवृष्टीमुळे उपलब्ध जलसाठा लक्षात घेऊन पर्जन्यवृष्टीत सुधारणा होईपर्यंत प्रशासनातर्फे मुंबईच्या पाणीपुरवठ्यात २७ जूनपासून १० टक्के पाणी कपात करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. जुलैच्या पहिल्या आठवड्यापासून मुंबईला पाणीपुरवठा करणाऱया तलाव क्षेत्रात समाधानकारक पाऊस झाल्यामुळे आणि पुरेशा प्रमाणात जलसाठा उपलब्ध झाल्याने पाणी पुरवठ्यातील १० टक्के पाणी कपातीचा निर्णय रद्द करण्यात आला.

मुंबई महानगराला पाणीपुरवठा करणाऱया अप्पर वैतरणा, मोडकसागर, तानसा, मध्य वैतरणा जलाशय, भातसा, विहार आणि तुळशी या सात जलाशयांमध्ये मिळून संपूर्ण मुंबई महानगराला पाणीपुरवठा करण्यासाठी एकूण उपयुक्त जलसाठा १४ लाख ४७ हजार ३६३ दशलक्ष लिटर इतका असावा लागतो.

टॅग्स :पाणीपाऊस