Join us

सीबीआय अधिकारी बनून उकळले लाखो; २४ तासांत दोघांना अटक, पैसे गोठवण्यात पोलिसांना यश

By ऑनलाइन लोकमत | Published: July 30, 2023 7:05 AM

जुहू पोलिसांनी २४ तासांत तोतया सीबीआय अधिकाऱ्यांच्या टोळीतील दोघांना बेड्या ठोकल्या. त्यांच्याकडून उकळण्यात आलेले लाखो रुपयांची रक्कमही गोठविण्यात पोलिसांना यश आले आहे.

मुंबई : कस्टम ड्यूटी प्रकरणात तुमचे पार्सल अडकले आहे. त्यामुळे तुमच्यावर कारवाई होईल, अशी भीती दाखवत सीबीआय अधिकारी असल्याचे भासवून एका महिलेकडून लाखो रुपये उकळण्यात आले. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच तिने पोलिसांत धाव घेतली. जुहू पोलिसांनी २४ तासांत तोतया सीबीआय अधिकाऱ्यांच्या टोळीतील दोघांना बेड्या ठोकल्या. त्यांच्याकडून उकळण्यात आलेले लाखो रुपयांची रक्कमही गोठविण्यात पोलिसांना यश आले आहे.तुमचे पार्सल आले आहे. मात्र, ते कस्टम ड्यूटी प्रकरणात अडकले आहे, असा निनावी फोन स्नेहा शाह (३२) यांना आला. त्यानंतर स्वतःला सीबीआय अधिकारी म्हणवणाऱ्या भामट्यांनी त्यांच्याकडून लाखो रुपये उकळले. मात्र या प्रकरणी त्यांनी जुहू पोलिस ठाण्यात धाव घेतल्यावर आरोपींना २४ तासांच्या आत अटक झाली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार शाह यांना २४ जुलै रोजी अज्ञात व्यक्तींने कुरिअर कंपनीतून  बोलत असल्याचे सांगत तुमचे पार्सल कस्टममध्ये पकडले गेल्याचे सांगितले. या प्रकरणातून सुखरूपपणे बाहेर काढू, असे यावेळी त्यांनी सांगितले. त्यांच्यावर विश्वास ठेवत शाह यांनी भामट्यांना २ लाख १४ हजार ४६५ रुपये दिले. यासाठी स्काय ॲपचा वापर करण्यात आला होता. फसवणुकीचा तपास परिमंडळ ९ चे पोलिस उपायुक्त कृष्णकांत उपाध्याय आणि वरिष्ठ पोलिस निरीक्षक अजित वर्तक यांच्या मार्गदर्शनाखाली निरीक्षक प्रमोद कांबळे, उपनिरीक्षक राहुल शिंदे, प्रशांत आरंगळे आणि शिपाई समीर तांबोळी तसेच रवींद्र सपकाळ यांनी केला. शाह यांच्या बँक खात्यातून पैसे वळते झाले होते. तेव्हा खातेधारकाची बँक खात्याची माहिती मागवण्यात आली. त्यावेळी पैसे गेलेल्या पत्त्यावरून भाईंदर आणि मध्य प्रदेशमधून सागर माने (२९) आणि अशोक आचार्य (२९) या दोघांना अटक केली. 

आमच्या पथकाने फसवणूक करणाऱ्या टोळीतील दोघांना अटक केली असून, लवकरच फरार म्होरक्याच्याही  मुसक्या आवळण्यात येतील. - अजित वर्तक, वरिष्ठ पोलिस निरीक्षक, जुहू पोलिस ठाणे 

टॅग्स :गुन्हेगारीमुंबईगुन्हा अन्वेषण विभागपोलिसपैसा