मुंबई : मुंबई महानगरक्षेत्रात अकरावी प्रवेशासाठी राबवण्यात येत आलेल्या आॅनलाइन प्रवेशाची प्रक्रिया थंडावल्याचे दिसत आहे. आतापर्यंत जाहीर झालेल्या दोन गुणवत्ता याद्यांमध्ये २ लाख ३२ हजार विद्यार्थ्यांचे प्रवेश निश्चित झाले असले तरी गुरुवारपर्यंत केवळ १ लाख ८ हजार ६४६ विद्यार्थ्यांनीच महाविद्यालयात प्रवेश घेतला आहे. त्यामुळे यंदाही अकरावीच्या सुमारे एक लाखांच्या आसपास जागा रिक्त राहण्याची शक्यता आहे.अकरावी आॅनलाइन प्रवेशाच्या २२ जून रोजी जाहीर झालेल्या पहिल्या गुणवत्ता यादीत १ लाख ८८ हजार १५८ विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यात आला होता. परंतु केवळ ८३ हजार ६३५ विद्यार्थ्यांनीच शुल्क भरुन प्रवेश घेतला आहे, तर ३० जूनला जाहीर झालेल्या दुसऱ्या गुणवत्ता यादीत ४४ हजार १२३ प्रवेशाच्या जागा निश्चित झाल्या होत्या. मात्र यापैकी गुरूवारी सायंकाळपर्यंत २५ हजार २१ जागांवरच विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतलेले आहेत. ६ जुलै रोजी जाहीर होणाऱ्या तिसऱ्या आणि अंतिम गुणवत्ता यादीत सुमारे ३० ते ४० हजारांची भर पडणे कठीण आहे.प्रवेशाची पहिली गुणवत्ता यादी जाहीर होण्यापूर्वी इनहाऊस, अल्पसंख्यांक आणि व्यवस्थापन कोट्यातील प्रवेशाच्या राखीव असलेल्या ४० हजार जागा या महाविद्यालयांकडून आॅनलाइन प्रवेशासाठी देण्यात आल्या आहेत. (प्रतिनिधी)
अकरावीच्या लाखभर जागा रिक्त राहणार?
By admin | Published: July 03, 2015 3:38 AM