गौरी टेंबकर, लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई: पतपेढीचे ऑनलाईन लायसन्स मिळवून देतो असे सांगत ट्रॅव्हल्स बुकिंगचा व्यवसाय करणाऱ्या व्यावसायिकाला लाखो रुपयांचा चुना लावण्याचा प्रकार कांदिवली परिसरात घडला. या विरोधात पिडीताने कांदिवली पोलिसात तक्रार दिल्यावर पुरुषोत्तम तागड नावाच्या व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल केला.
तक्रारदार आकाश यादव (३६) यांच्या तक्रारीनुसार त्यांना एक पतपेढी सुरू करायची होती. त्यामुळे पतपेढी बनवून देणाऱ्या संस्थांची ऑनलाइन माहिती ते मोबाईलवर शोधत होते. त्यादरम्यान त्यांना २० सप्टेंबर रोजी चेंबूर मध्ये श्री सद्गुरु साकार निधी बँक लिमिटेड नावाची पतपेढी बनवण्यात आल्याचे दिसले. त्यानुसार त्यांनी त्या ठिकाणी असलेल्या मोबाईल क्रमांकावर फोन केला आणि त्या ठिकाणी अंबिका नावाच्या महिलेने फोन उचलला.अंबिकाने यादव यांना अजित निंबाळकर नामक पुण्याच्या व्यक्तीचा नंबर दिला. यादव यांनी त्याला फोन केल्यावर सध्या तो कामात व्यस्त असून थोड्या दिवसांनी फोन करा असे निंबाळकरने सांगितले. यादव यांनी २५ सप्टेंबर रोजी पुन्हा निंबाळकर ना फोन केल्यावर ते स्वतः कामात व्यस्त असल्याने पुरुषोत्तम तागड नावाच्या व्यक्तीचा नंबर त्याने दिला. तागडला फोन करत पतपेढी रजिस्ट्रेशन करून देण्यासाठी किती खर्च येईल, तसेच त्यांची फी याबाबत यादवनी चौकशी केली. त्यावर त्यांना ३.२५ लाख रुपयांचा खर्च येईल असे सांगत आधी ७० टक्के रक्कम आणि काम झाल्यावर उर्वरित ३० टक्के भरावे लागतील असे तागड म्हणाला. पतपेढीची परवानगी मिळत असल्याने यादव पैसे द्यायला तयार झाले आणि त्यांनी तागड ने दिलेल्या बँक खात्यावर थोडे थोडे करत ३ लाख ४० हजार रुपये पाठवले. मात्र यादवचे कोणतेही काम करण्यात आले नाही आणि ते पैसेही परत न देता त्यांची फसवणूक केली गेली. या विरोधात त्यांनी कांदिवली पोलिसांना तक्रार दिल्यावर भारतीय दंड संहिता कलम ४०६,४२० अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.