दुबई, मलेशियात नाेकरी देताे म्हणून लाखाेंचा गंडा
By ऑनलाइन लोकमत | Published: January 30, 2024 08:56 AM2024-01-30T08:56:14+5:302024-01-30T08:56:58+5:30
Crime News: मलेशिया व दुबई येथे नोकरी लावून देण्याचे प्रलोभन दाखवून १५ जणांना बाेगस व्हिसा व बनावट विमान तिकीट देऊन ८ लाख ३० हजारांची फसवणूक केल्याची घटना भिवंडीत समोर आली आहे.
भिवंडी - मलेशिया व दुबई येथे नोकरी लावून देण्याचे प्रलोभन दाखवून १५ जणांना बाेगस व्हिसा व बनावट विमान तिकीट देऊन ८ लाख ३० हजारांची फसवणूक केल्याची घटना भिवंडीत समोर आली आहे. या प्रकरणी चार जणांविरोधात शनिवारी शांतीनगर पोलिस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
शहरातील शांतीनगर भागातील पिराणी पाडा येथील टेलर व्यावसायिक तफजुल हुसैन अब्दुल मन्नार अन्सारी (४३) यांच्यासह इतर १५ जणांना शहरातील बाग ए फिर्दोस्त या परिसरातील मोहमद फुरकान अली फारूकी अली अन्सारी, डॉ. फैजान फारूकी अली अन्सारी, फारूकी अली अन्सारी व इमराना खातुन मोहमद फुरकान अन्सारी यांनी आपापसात संगनमत करून कामासाठी मलेशिया व दुबई येथे पाठवितो, असे सांगितले.
त्यांच्याकडून व्हिसा व विमान तिकिटाचे ८ लाख ३० हजार रुपये घेऊन या सर्वांना बनावट व्हिसा, व मुंबई ते मलेशिया व मुंबई ते दुबई असे बनावट एअर इंडिया विमान कंपनीचे विमान तिकीट देऊन मुंबई विमानतळावर रवाना केले.
चौघांवर गुन्हा
फसवणूक झाल्याचे लक्षात येताच तफजुल अन्सारी यांनी दिलेल्या तक्रारीवरून शांतीनगर पोलिसांनी मोहमद फुरकान अली फारूकी अली अन्सारी, डॉ. फैजान फारूकी अली अन्सारी, फारूकी अली अन्सारी व इमराना खातुन मोहमद फुरकान अन्सारी या चौघांविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल केला.
विमानतळावर त्यांना आपले तिकीट रद्द झाल्याचे समजले.
त्यानंतर पुन्हा आरोपींनी या सर्वांना कोलकाता ते मलेशिया असे एअर एशिया विमान कंपनीचे बनावट तिकीट देऊन कोलकाता विमानतळावर पाठविले.
तेथेही त्यांचे विमान तिकीट रद्द झाल्याचे समजले.