गॅस एजन्सीमध्ये डल्ला मारत लाखो रुपये लंपास, पोलिसांनी चोरांचा गाशा गुंडाळला, अल्पवयीन ताब्यात, एकाला अटक
By गौरी टेंबकर | Published: December 6, 2023 12:47 AM2023-12-06T00:47:14+5:302023-12-06T00:47:41+5:30
या विरोधात पोलिसांनी अल्पवयीन मुलाला ताब्यात घेत एकाला अटक केली आहे.
मुंबई: चारकोप परिसरात असलेल्या भारत गॅस एजन्सीचे लोखंडी शटर उचकटून लाखोंचा डल्ला मारण्याचा प्रकार घडला होता. या विरोधात पोलिसांनी अल्पवयीन मुलाला ताब्यात घेत एकाला अटक केली आहे.
अटक आरोपीचे नाव विकास कांबळे (२७) असे असून तो मालाड पश्चिम येथील सुंदर लेन परिसरातील रहिवासी आहे. चारकोप मधील आर के अँड सन्स या भारत गॅस एजन्सी ऑफिसचे च्या लोखंडी शटर उचकटून कोणीतरी अज्ञात इसमाने २ लाख ३५ हजार ५०० रुपयांची रोकड पळवून नेली. सदर गुन्ह्याच्या तपासा दरम्यान गुन्ह्याच्या घटनास्थळावरील सी.सी. टी.व्ही फुटेज तपासण्यात आले. आरोपीतांचे ओळख पटवण्यासाठी मुंबई परिसरातील पोलीस ठाण्यातील अभिलेख तपासण्यात आला.
मात्र, आरोपींना अद्याप अद्याप अटक न झाल्याने आरोपीतांचा कोणत्याही पोलीस ठाण्यास अभिलेख मिळवून येत नव्हता. तसेच नमूद गु़न्हयातील अटक आरोपी हे गुन्हा करण्यासाठी वापरलेली वाहने ही काही अंतरावर गेल्यानंतर बदलत असल्याने आरोपी यांच्या जाण्या - येण्याच्या मार्गावरील माहिती प्राप्त करणे कठीण होते. तरी देखील अत्यंत बारकाईने घटनास्थळावरील तसेच आरोपी पळून गेलेल्या मार्गातील सुमारे १५० सी.सी.टी.व्ही. फुटेजची तपासणी तपास अधिकाऱ्यांनी केली. आरोपी मालाड पश्चिमच्या सुंदर लेन परिसरात असलेल्या एस.आर.ए तसेच म्हाडा इमारतींमध्ये राहत असल्याबाबत खात्री झाली.
पोलीस अखेर एस.आर.ए. अधिकारी तसेच वॉचमन, लिफ्टमन बनुन इमारतीमध्ये चौकशीसाठी गेले. त्यांनी आरोपीतांचा पत्ता प्राप्त केला आणि आरोपीपितांना सापळा रचून ताब्यात घेण्यात आले. आरोपी हे पुण्यातील पिंपरी चिंचवडचे राहणारे असल्याचे तपासात समोर आले आहे. आरोपीनी अंधेरी, बांद्रा, जुहू, चेंबूर, ठाणे, तुर्भे, वाशी या परिसरात दुकानांचे शटर उचकटून घरफोडीचे गुन्हे केल्याचे प्राथमिक चौकशीत सांगितले आहे. त्यामुळे आणखीन घरफोडीचे गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता असून तपास सुरू आहे.