Join us

चारकोप, गोराई परिसरातील लाखो नागरिकांचे गॅस पाईप लाइनचे स्वप्न होणार साकार -  विनोद तावडे

By ऑनलाइन लोकमत | Published: April 09, 2018 4:44 PM

चारकोप, गोराई परिसरातील क्लस्टर आणि बंगल्यात राहणा-या हजारो कुटुंबीयांच्या लाखो नागरिकांचे गॅस पाईप लाईनचे अनेक वर्षांचे स्वप्न साकार होऊ शकेल, असेही शिक्षण मंत्री व मुंबई उपनगर जिल्ह्याचे पालकमंत्री विनोद तावडे यांनी सांगितले.

- मनोहर कुंभेजकर

मुंबई :  गेली कित्येक वर्षे चारकोप गोराई क्लस्टर आणि बंगलो मधील नागरिक महानगर पाईप लाईन गॅस जोडणीच्या प्रतीक्षेत होते. आधीच्या कॉंग्रेसच्या काळात तत्कालिन खासदारांनी फक्त आश्वासन दिले, मात्र प्रत्यक्ष काहीच केले नाही, पण आपले सरकार आल्यानंतर याबाबत सातत्याने पाठपुरावा करण्यात आला. केंद्रीय पेट्रोलियम मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्यापर्यंत हा विषय खासदार गोपाळ शेट्टी यांनी व मी सातत्याने मांडल्यानंतर महानगर गॅसच्या अधिका-यांनीही जलदगतीने कार्यवाही केली आणि चारकोप, गोराई परिसरातील क्लस्टर आणि बंगल्यात राहणा-या हजारो कुटुंबीयांच्या लाखो नागरिकांचे गॅस पाईप लाईनचे अनेक वर्षांचे स्वप्न साकार होऊ शकेल, असेही शिक्षण मंत्री व मुंबई उपनगर जिल्ह्याचे पालकमंत्री विनोद तावडे यांनी सांगितले.

चारकोप, गोराई येथील क्लस्टर गृहनिर्माण संस्था व बंगले यांना महानगर गॅस पाईपलाईन जोडणीचा भूमिपूजन चारकोप येथील सेक्टर ६ व गोराई सेक्टर १ येथे शिक्षण मंत्री व मुंबई उपनगर जिल्हयाचे पालकमंत्री विनोद तावडे व खासदार गोपाळ शेट्टी यांच्या प्रमुख उपस्थितीत काल सायंकाळी पार पडला.लोकमतने सर्वप्रथम वृत्त गेल्या शनिवारी ऑनलाईन वर दिल्यानंतर लोकमतची बातमी उत्तर मुंबईसह मुंबईत सोशल मीडियावर बातमी व्हायरल झाली.

खासदार गोपाळ शेट्टी यांनीही या विषयात गेली 4 वर्षे सातय्याने पाठपुरावा करीत हा प्रश्न सोडविण्यासाठी प्रयत्न केल्याचे सांगतानाच तावडे म्हणाले की, महानगर गॅस पाईप लाईनमुळे चारकोप- गोराई परिसरातील सुमारे ८०० गृहनिर्माण संस्था आणि ६०० बंगल्यांमधील सुमारे २५ हजार कुटुंबामधील लाखो सदस्यांना फायदा होणार आहे. भूमिपूजन झाल्यानंतर लवकरच प्रत्यक्ष लाखो कुटुंबियांना महानगर गॅसचा लाभ मिळणार आहे. पाईपलाईन गॅस जोडणी ही एक सुरुवात असून याचा फायदा आता क्लस्टर मध्ये राहणारे मुंबईतील इतर म्हाडाच्या वसाहतींमधील रहिवाश्यांना होणार आहे. विशेष करून महिला वर्गाला या पाईप गॅसची जोडणीचा दिलासा मिळणार असून गॅस सिलेंडर संपल्यावर दुसरा कधी येईल याची वाट पहावी लागणार नाही, असेही तावडे यांनी सांगितले.

गोराई १ येथील गणेश मैदान येथे झालेल्या जाहीर सभेत भाजपचे उत्तर मुंबई जिल्हा अध्यक्ष विनोद शेलार,भाजपचे मुंबई उपाध्यक्ष जे पी मिश्रा, नगरसेविका  बिना दोषी, अंजली खेडेकर, आसावरी पाटील, नगरसेवक प्रवीण शाह, विद्यार्थी सिंग तसेच महानगर गॅस व्यवस्थापकीय संचालक राजीव माथुर, वरिष्ठ उपाध्यक्ष शाश्वत अग्रवाल यांच्यासह चारकोप, गोराई मधील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

टॅग्स :विनोद तावडेमुंबई