Join us

गुन्हा दाखल झाल्याची भीती दाखवत लाखो लाटले; पवई पोलिसात गुन्हा दाखल 

By गौरी टेंबकर | Published: July 02, 2024 2:51 PM

या विरोधात त्यांनी पवई पोलीस ठाण्यात तक्रार दिली असून तपास सुरू आहे. 

गौरी टेंबकर, लोकमत न्यूज नेटवर्क 

मुंबई: गुन्हा दाखल झाल्याची भीती दाखवत पवईतील एका ज्येष्ठ नागरिकाला लाखो रुपयांचा चुना लावण्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या विरोधात त्यांनी पवई पोलीस ठाण्यात तक्रार दिली असून तपास सुरू आहे. 

तक्रारदार पुनीत कृष्णा (६१) हे एका खाजगी कंपनीत काम करतात. त्यांनी पवई पोलिसांना दिलेल्या तक्रारीनुसार, २७ जून रोजी दुपारी २.३२ च्या सुमारास अनोळखी मोबाईल क्रमांकावरून फोन आला. कॉलरने स्वतःचे नाव सुमित मिश्रा असे सांगत तो दिल्लीच्या इंदिरा गांधी विमानतळावरील कस्टम इन्स्पेक्टर आहे असे पुनीत यांना सांगितले. तसेच तुम्ही फेडेक्सद्वारे पाठवलेले एक पार्सल आम्हाला मिळाले असून त्यामध्ये ड्रग सापडले आहेत असा आरोप पुनीतवर केला. तसेच तुम्ही प्रॉपर्टीचा अपहार केला असून या प्रकरणी तुमच्यावर केस दाखल करण्यात आली आहे. ज्याचा तपास सीबीआय करत आहे असेही सांगण्यात आले. मात्र मी पार्सल पाठवले नसल्याचे पुनीत यांनी त्याला सांगितल्यावर त्याने काही एक ऐकून न घेता सुनीलकुमार नावाच्या आणि स्वतःला दिल्ली पोलीस अधिकारी असल्याचे सांगणाऱ्या व्यक्तीकडे फोन दिला. त्याने देखील ही केस हाय प्रोफाईल असून सीबीआय मार्फत कॉन्फिडेन्सियल इंक्वायरी सुरू असल्याचे सांगत पुनीत यांना घाबरवले. त्यानंतर पुन्हा २८ जून रोजी अनिल यादव नावाच्या व्यक्तीने फोन करत मी सीबीआय अधिकारी असून तुमच्या बँक खात्याची आरबीआय मार्फत चौकशी होणार आहे. याची लिगल फी २ लाख रुपये असून ते त्याने दिलेल्या खात्यात पाठवायला सांगितले.

पुनीत यांनी ती रक्कम पाठवल्यावर पुन्हा त्यांच्याकडून एक लाखांची मागणी करण्यात आली ते पैसेही त्यांनी पाठवून दिले. पुढे अटक वॉरंटच्या नावे त्यांच्याकडून तीन लाख रुपये घेण्यात आले. याप्रकरणी त्यांनी पत्नीशी तसेच मित्र परिवाराशी चर्चा केल्यावर फसवणूक झाल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्यानुसार त्यांनी पवई पोलीस ठाणे गाठत या विरोधात तक्रार दिल्यावर गुन्हा दाखल करण्यात आला.

टॅग्स :गुन्हेगारी