Join us

लेक झाली लाडकी!

By admin | Published: July 04, 2014 4:00 AM

देशात मुलींचा जन्मदर कमी होत असल्यामुळे चिंता व्यक्त होत आहे. परंतु नवी मुंबईकरांना मात्र लेक ‘लाडकी’ असल्याचे स्पष्ट झाले आहे

नवी मुंबई : देशात मुलींचा जन्मदर कमी होत असल्यामुळे चिंता व्यक्त होत आहे. परंतु नवी मुंबईकरांना मात्र लेक ‘लाडकी’ असल्याचे स्पष्ट झाले आहे. शहरात मुलींचा जन्मदर ९३० एवढा आहे. हे प्रमाण राज्यात दुसऱ्या क्रमांकाचे असून महापालिकांमध्ये नवी मुंबई अग्रस्थानी आहे. स्त्री भ्रुण हत्या ही देशात गंभीर समस्या झाली आहे. जन्मापूर्वीच मुलींचा जीव घेतला जात आहे. यामुळे अनेक राज्यात मुलांच्या तुलनेमध्ये मुलींचे प्रमाण घसरत चालले आहे. महाराष्ट्रातही स्त्री भु्रण हत्या थांबविण्यासाठी शासन व सामाजिक संस्थांनी मोठी मोहिम सुरू केली आहे. सर्व नगरपालिका व महानगरपालिकांना त्यांच्या कार्यक्षेत्रामध्ये जनजागृती करण्याच्या सूचना राज्य आरोग्य सेवा उपसंचालकांनी दिल्या आहेत. करण्यात येणाऱ्या उपाययोजनांची व वार्षीक जन्मदराची नोंद ठेवली जात आहे. २०१३ या वर्षात नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रात मुलींचा जन्मदर ९३० एवढा आहे. रत्नागिरी नगरपालिका क्षेत्राचा प्रथम क्रमांक असून त्यानंतर नवी मुंबईचा नंबर लागत आहे. राज्यातील महापालिकांमध्ये सर्वात जास्त जन्मदर नवी मुंबईमध्येच असल्याचे स्पष्ट झाले आहे. नवी मुंबईमध्ये २००२ मध्ये मुलींचा जन्मदर ८४९ (एक हजार मुलांच्या तुलनेत)एवढा कमी होता. हायटेक सिटी म्हणून गौरविण्यात येणाऱ्या शहरासाठी ही गंभीर गोष्ट होती. पुरूष व स्त्रियांच्या संख्येमुळे होणाऱ्या सामाजिक असमतोलाची गंभीर दखल घेवून महापालिकेने मागील १२ वर्षात कठोर उपाययोजना राबविण्यास सुरुवात केली आहे. महापालिकेचे मुख्य वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. रमेश निकम यांनी साांगितले की, पालिकेने सर्व सोनोग्रोफी सेंटर्सची अधिकृत नोंदणी केली आहे. विनापरवाना सुरू असलेल्या सेंटर्सवर प्रतिबंधात्मक कारवाई केली आहे. त्यासाठी धडक मोहिमा राबविण्यात आल्या असून काही सेंटर्सना सील ठोकले आहे. पोस्टर्स, पथनाट्य व इतर मार्गाने नागरिकांमध्ये जनजागृती केली असून त्याचा सकारात्मक परिणाम दिसून आला आहे. (प्रतिनिधी)