लक्ष्मी आणि कुबेर पूजन

By admin | Published: November 12, 2015 12:37 AM2015-11-12T00:37:31+5:302015-11-12T00:37:31+5:30

संपत्तीची देवता म्हणून लक्ष्मी आणि कुबेराच्या पूजेने बुधवारी सायंकाळी उभी मुंबापुरी न्हाऊन निघाली.

Lakshmi and Kuber worship | लक्ष्मी आणि कुबेर पूजन

लक्ष्मी आणि कुबेर पूजन

Next

मुंबई : संपत्तीची देवता म्हणून लक्ष्मी आणि कुबेराच्या पूजेने बुधवारी सायंकाळी उभी मुंबापुरी न्हाऊन निघाली. सायंकाळी सहा ते साडेआठ वाजेदरम्यान बहुतांश मुंबईकरांनी घरातील पैशांपासून वाहनांची पूजा करण्याचा मुहूर्त साधला. तरी उद्या (गुरुवारी) असलेल्या कार्तिक शुद्ध प्रतिपदा अर्थात दिवाळीचा पाडवा या साडेतीन मुहूर्तांपैकी अर्ध्या मुहूर्तावर सोने, इलेक्ट्रॉनिक वस्तू आणि गृह खरेदीची मोठी उलाढाल होण्याची अपेक्षा व्यापारीवर्गाने व्यक्त केली आहे.
लक्ष्मीपूजनाच्या मुहूर्तावर व्यापारीवर्गाने मुहूर्त साधत चोपडा पूजन केले. आजपासून व्यवहाराच्या नव्या वह्यांचा वापर करणार असल्याचे व्यापाऱ्यांचे नेते मोहन गुरूनानी यांनी सांगितले, तर पाडव्याच्या मुहूर्तावर वजन काट्यांचे पूजन करणार असल्याचे ते म्हणाले. पाडव्याच्या दिवशी सर्व व्यापाऱ्यांकडे एकाच भावाने धान्य आणि वस्तूंचे वाटप करण्यात येईल, असेही त्यांनी सांगितले.
सायंकाळच्या मुहूर्तावर संपत्तीची पूजा करण्यात मुंबईकर दंग झाल्याने रस्त्यांवरील फटाक्यांच्या आतषबाजीला काही वेळेसाठी ब्रेक लागल्याचे चित्र होते. त्याआधी वाहनांची पूजा करण्यासाठी सकाळपासूनच चालकांनी वॉशिंग सेंटरबाहेर तोबा गर्दी केली होती. फुलांच्या बाजारतही तीच परिस्थिती होती. मध्यरात्रीपासूनच गजबजलेल्या फुल मार्केटमधील गर्दी सायंकाळपर्यंत कायम होती.
दिवाळीनिमित्त बाजारपेठा विविध वस्तूंनी सजल्या असल्या, तरी यंदा भाऊबीजेसाठी बाजारात नवा ट्रेंड समोर आला आहे. आॅनलाइन शॉपिंगची चलती असून रिटेलर्सनेही ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी कॉम्बो पॅकचा धमाका ठेवला आहे. दादर, मस्जिद बंदर, क्रॉफर्ड मार्केट या प्रमुख बाजारांत भाऊबीजेच्या खरेदीस झुंबड उडाली आहे. भाऊबीजेला हटके भेटवस्तू देण्याची प्रत्येक बहिणीची इच्छा असते. ग्राहकांची ही मागणी लक्षात घेऊन अनेक विक्रेत्यांनी यंदा कॉम्बो पॅकची सोय केली आहे. कॉस्मेटिक्स, ज्वेलरी, चॉकलेट, ड्रायफ्रुट, घड्याळ, वॉलपीस, गॉगल, बीन बॅग्ज, हॅण्डबॅग, आॅफिसवेअर, फुटवेअर विविध प्रकारचे कॉम्बो यात पाहायला मिळत आहेत. यातील कॉस्मेटिक्स पॅकला अनेकांची पसंती मिळत असल्याचे दुकानदारांनी सांगितले.
हल्ली कॉस्मेटिक्स या पुरुष आणि स्त्रियांच्या रोजच्या वापरातील वस्तू आहेत. म्हणूनच याचे खास कॉम्बो पॅक सणानिमित्त तयार केल्याचे मस्जिद बंदर येथील एका विक्रेत्याने सांगितले. कॉम्बो पॅकमुळे वस्तूंच्या किमतीतही बराच फरक पडतो. शिवाय त्यांची पॅकिंगही आकर्षक असल्यामुळे भेटवस्तू म्हणून हा उत्तम पर्याय आहे. हिंदमाता, दादर, मंगलदास मार्केट अशा रिटेलर्सपासून सेमी होलसेलच्या बाजारांत कपड्यांची खरेदी करायला मुंबईकरांची पसंती दिसत आहे. त्यात रेडिमेड कपड्यांना
अधिक पसंती मिळत
आहे.आॅनलाइन शॉपिंग करणाऱ्यांच्या संख्येतही दिवसागणिक वाढ होताना दिसत आहे. स्वस्त आणि मस्त अशा स्मार्र्ट फोनला आॅनलाइनवर अधिक पसंती मिळत आहे. याशिवाय स्वयंपाकघरात लागणाऱ्या मायक्रोव्हेव, टोस्टर, यांसारख्या इलेक्ट्रॉनिक्स वस्तूंची खरेदी अधिक होत आहे. बाजारातील गर्दी टाळून घरबसल्या एकाच वस्तूसाठी अनेक पर्याय उपलब्ध असल्याने अनेक जण आॅनलाइन खरेदीचा पर्याय अवलंबत आहेत. त्यामुळे बाजारामधील गर्दीला काही प्रमाणात चाप बसल्याचे मतही विक्रेत्यांनी व्यक्त केले.

Web Title: Lakshmi and Kuber worship

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.