नयनरम्य आतषबाजी करत घरोघरी उत्साहात लक्ष्मीपूजन; प्रकाशाच्या उत्सवाला सुरुवात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 28, 2019 12:13 AM2019-10-28T00:13:58+5:302019-10-28T00:14:04+5:30

रंगीबेरंगी फटाक्यांमुळे आसमंत गेला भरून

Lakshmipujaan in the house cheering with beautiful fireworks; The beginning of the festival of light | नयनरम्य आतषबाजी करत घरोघरी उत्साहात लक्ष्मीपूजन; प्रकाशाच्या उत्सवाला सुरुवात

नयनरम्य आतषबाजी करत घरोघरी उत्साहात लक्ष्मीपूजन; प्रकाशाच्या उत्सवाला सुरुवात

Next

मुंबई : दीपोत्सवातील मंगलमय वातावरणात घरोघरी, तसेच प्रत्येक व्यापारी आणि व्यावसायिक पेढीवर अपूर्व उत्साहात मुहूर्त साधत रविवारी लक्ष्मीपूजन करण्यात आले. लक्ष्मीपूजनानंतर सायंकाळी प्रकाशाच्या उत्सवाला दिमाखात प्रारंभ झाला. रंगीबेरंगी आणि आकर्षक फटाक्यांमुळे आसमंत भरून गेला होता. सायंकाळपासून आकाशबाण आणि रंगीबेरंगी नयनरम्य आतषबाजीने रात्री उशिरापर्यंत सारा आसमंत उजळून निघाला होता.

लक्ष्मीपूजनासाठी लागणारी झेंडूची फुले, फळे, विड्याची पाने, लक्ष्मीची मूर्ती, फोटो आदी वस्तूंची खरेदी करण्यासाठी सकाळी-दुपारी शहरातील प्रमुख बाजारपेठांत गर्दी झाली होती. सकाळी, दुपारी आणि सायंकाळी शुभ मुहूर्तावर पारंपरिक पद्धतीने लक्ष्मीपूजन करण्यात आले. घरोघरी केरसुणीची लक्ष्मीच्या स्वरूपात पूजा करण्यात आली. यश, कीर्ती आणि धनलाभाची आराधना करत महालक्ष्मीची पूजा करण्यात आली. दिवाळीच्या पहिल्याच दिवशी रविवार असल्याने मुंबईकरांनी कुटुंबीय, मित्रपरिवाराची भेट घेऊन सण साजरा करण्यावर भर दिला.

लक्ष्मीपूजनानंतर सायंकाळी दिव्यांची आरास करण्यात आली होती. झेंडूच्या फुलांची तोरणे, रांगोळ्यांच्या पायघड्या आणि सायंकाळच्या अमृतवेळी मांगल्य आणि भक्तिभावाच्या सुगंधी वातावरणात घराघरांत वैभव, सुख-समृद्धी आणि भरभराटीचे दान देणाऱ्या लक्ष्मीचे स्वागत करण्यात आले. मनोभावे पूजन करण्यात आले. सायंकाळी मुंबईकरांनी गिरगाव, दादर, जुहू, मरिन ड्राइव्ह, नरिमन पॉइंट, वरळी सीफेस आणि वर्सोवा येथील चौपाट्यांवर फटाक्यांच्या आतषबाजीसाठी गर्दी केली. अबालवृद्धांसह लहानग्यांनी एकत्र येत फटाके लावून हा सण साजरा केला. निवासी भागात आवाजापेक्षा फॅन्सी प्रकारांना पसंती मिळाल्याचे पाहावयास मिळाले. सिग्नल लाइट, कलर फ्लॅश, ब्रेक व पिकॉक डान्स, व्हिसल व्हील अशा विविध फॅन्सी प्रकारांची आकाशात जणू परस्परांशी स्पर्धा सुरू असल्याचे पाहावयास मिळाले.

दिवाळी पाडव्याचा आज उत्साह
साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेला दिवाळी पाडवा सोमवारी आहे. बलिप्रतिपदा म्हणूनही ओळखल्या जाणाºया या दिवशी ‘इडा पिडा टळो बळीचे राज्य येवो’ असे म्हणण्याची परंपरा आहे. या दिवशी विक्रम संवत सुरू होते. आर्थिक हिशेबाच्या दृष्टीने व्यापारी बांधव दिवाळीतील पाडवा ही नववर्षाची सुरुवात मानतात.

आस्थापनांमध्ये लक्ष्मीपूजन
शहरातील व्यापारी पेढ्यांवर जमा-खर्चाच्या, रोजकीर्द, खतावणीच्या नवीन वह्यांची पूजा करण्यात आली. रविवारी लक्ष्मीपूजनाचा मुहूर्त आल्याने काही आस्थापनांमध्ये एक दिवस आधीच लक्ष्मीपूजन करण्यात आले. सोशल नेटवर्किंग साइट्स, व्हॉट्सअ‍ॅॅपद्वारे एकमेकांना दिवाळीच्या शुभेच्छा देण्याचा सिलसिला दिवसभर चालला. लक्ष्मीपूजनानंतर सायंकाळी शहरातील देवी मंदिरांमध्ये दर्शनासाठी नागरिकांची गर्दी झाली होती.

Web Title: Lakshmipujaan in the house cheering with beautiful fireworks; The beginning of the festival of light

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.