मुंबई : लालबाग गणेशगल्ली येथील साराभाई इमारतीच्या दुसऱ्या मजल्यावर लग्नाच्या घरात जेवण बनवले जात असताना सिलिंडरचा स्फोट झाला. या दुर्घटनेत १६ जण जखमी झाले होते. त्यातील १० जणांची प्रकृती गंभीर होती. रविवारी रात्री केईएम रुग्णालयात सुशीला बागरे (६२) या महिलेचा, तर मध्यरात्री करीम (४५) यांचा मृत्यू झाला. यामुळे मृतांचा आकडा दोनवर पोहोचला आहे. सध्या नऊ जणांची प्रकृती गंभीर आहे.केईएम रुग्णालयात १२ जणांना, तर ४ जणांना परेलच्या ग्लोबल रुग्णालयातील उपचारांनंतर भायखळ्याच्या मसिना रुग्णालयात पाठवण्यात आले आहे. केईएममध्ये दाखल असलेले ६ रुग्ण ७० ते ८० टक्के भाजले आहेत, तर मसिना रुग्णालयात उपचारांसाठी दाखल असलेले ४ जण ७० ते ९० टक्के भाजल्याने त्यांची प्रकृती गंभीर आहे.केईएम रुग्णालयात प्रकृती गंभीर असलेल्यांपैकी सुशीला बागरे (६२) या महिलेचा रविवारी रात्री मृत्यू झाला. तर मध्यरात्री करीम (४५) यांचा मृत्यू झाला. करीम ३० ते ५० टक्केच भाजले होते. त्याची प्रकृती स्थिर असल्याचे सांगण्यात आले होते. त्यानंतरही त्यांचा मृत्यू झाला. सध्या केईएम रुग्णालयात ५ व मसिना रुग्णालयात ४ अशा एकूण ९ जणांची प्रकृती गंभीर असल्याची माहिती रुग्णालय प्रशासनाने दिल्याचे पालिकेच्या आपत्कालीन व्यवस्थापन विभागाने सांगितले.केईएम रुग्णालयात १२ जखमी उपचार घेत आहेत. यामध्ये विनायक शिंदे (८५), ओम शिंदे (२०), यश राणे (१९), मिहीर चव्हाण (२०), ममता मुंगे (४८) हे सर्व जण ३० ते ५० टक्के भाजले असून त्यांची प्रकृती स्थिर आहे. केईएममध्ये प्रथमेश मुंगे (२७), रोशन अंधारी (४०), मंगेश राणे (६१), महेश मुंगे (५६), ज्ञानदेव सावंत (८५) हे सर्व ७० ते ८० टक्के भाजले असून त्यांची प्रकृती गंभीर आहे. मसिना हॉस्पिटलमध्ये ४ जखमी उपचार घेत आहेत. यामध्ये वैशाली हिमांशू (४४), त्रिशा (१३), बिपिन (५०) सूर्यकांत (६०) हे सर्व ७० ते ९५ टक्के भाजले आहेत, त्यांची प्रकृती गंभीर आहे.
लालबाग सिलिंडर स्फाेट; दाेघांचा मृत्यू नऊ जणांची प्रकृती गंभीर
By ऑनलाइन लोकमत | Published: December 08, 2020 6:49 AM