लालबाग की सिद्धिविनायक, तू नेमका आहेस तरी कुठे..?

By अतुल कुलकर्णी | Published: September 24, 2023 08:53 AM2023-09-24T08:53:32+5:302023-09-24T08:54:45+5:30

आस्थेने तुझ्या दर्शनाला येणाऱ्या भाविकांना तुझे कार्यकर्ते म्हणून मिरविणाऱ्यांनी धक्काबुक्की सुरू केली आहे.

Lalbagh or Siddhivinayak, where exactly are you..? | लालबाग की सिद्धिविनायक, तू नेमका आहेस तरी कुठे..?

लालबाग की सिद्धिविनायक, तू नेमका आहेस तरी कुठे..?

googlenewsNext

अतुल कुलकर्णी, संपादक, मुंबई 
प्रिय गणपती बाप्पा,

नेमका आहेस तरी कुठे..? दहा दिवसांचे तुझे आगमन... पण या दहा दिवसांत हा प्रश्न शंभरवेळा पडलाय... आम्ही उत्साहाने तुला घरी आणतो. कोणी कुंडीतल्या मातीपासून तुला आकार देतो... ज्याला जमेल तसे तुझे रूप आम्ही आकाराला आणतो. जगातला तू एकमेव असा देव आहेस ज्याला त्याचे भक्त त्यांना हवा तसा आकार, रंग, रूप देतात... आणि तू तितक्याच आनंदाने त्या रंग, रूपात खुलून दिसतोस. म्हणून तर सारं जग तुझ्यावर जिवापाड प्रेम करतं..! दुःख बाजूला सारून आनंदाने तुझं स्वागत करतो. मित्र, पाहुणे, आप्तेष्ट सगळ्यांना बोलावून तुझ्यासोबत आनंद साजरा करण्याची बातच न्यारी. तुझ्या दर्शनाला येणाऱ्या लाखो भाविकांना तू कधी त्रास होईल, अशी वातावरणनिर्मिती करत नाहीस. श्रद्धेने येणारे भक्त शिस्तीत तुझ्या चरणी लीन होतात. तू देखील त्यांच्या मनोकामना पूर्ण करतोस. तू कोणाच्या घरात असतोस... कोणाच्या मंडपात... छोट्या कॉलनीत... चिमुकल्यांच्या बालगणेश मंडळातही तू असतोस ना... भक्तांच्या मनोकामना पूर्ण करण्यासाठी अमुक ठिकाणीच येऊन मला भेटा, असा तुझा आग्रह कधीच नसतो. हे दहा दिवस वगळले तर अष्टविनायकाच्या निमित्ताने आठ ठिकाणी तू कायम आहेस... दगडूशेठ हलवाई मंदिरात... सिद्धिविनायक मंदिरात आहेस... तरीही तुझ्या भक्तांनी तुझ्या नावावर मांडलेला बाजार आता सहन होत नाही...

आस्थेने तुझ्या दर्शनाला येणाऱ्या भाविकांना तुझे कार्यकर्ते म्हणून मिरविणाऱ्यांनी धक्काबुक्की सुरू केली आहे. अनेकांनी तुला अमुकतमुक राजा अशा पदव्या दिल्या आहेत... त्यातल्या त्यात ‘लालबागचा राजा’ ही तुझी पदवी गेल्या काही वर्षांत अचानक उदयाला आली. एखाद्या कार्पोरेट कंपनीचा इव्हेंट असावा, अशा पद्धतीने तुझ्या दर्शनाला आधी फिल्मी सितारे बोलावले गेले. त्यांच्यापाठोपाठ राजकारणी आले. तुझी भव्य मूर्ती उभी करून काहींनी लालबागचा राजा पावतो, अशी तुझी प्रतिमा तयार केली. तुझ्या दर्शनाला जशी गर्दी वाढू लागली, तसे राजकारणी, चित्रपटतारे स्वतःच्या प्रमोशनसाठी येऊ लागले. ज्याचा चित्रपट प्रदर्शित होणार, त्या चित्रपटाचे नायक, नायिका तिथे येऊ लागले. चॅनलवाले दिवसभर तुझे दर्शन दाखवू लागले. भोळीभाबडी जनता नेहमीच अनुकरणप्रिय असते. तुझ्या दर्शनाला सगळी बडी मंडळी येतात हे पाहून त्यांनाही तुझ्या दर्शनाला यावेसे वाटू लागले. या सगळ्यात तुझ्या नावाने स्वतःचे दुकान चालविणाऱ्या ठरावीक कार्यकर्त्यांनी श्रद्धेचा बाजारच मांडला. त्यातून दर्शनाला येणाऱ्या महिला, लहान मुलं यांना धक्काबुक्की होऊ लागली. असभ्य वर्तन होऊ लागले. वडीलधारी, म्हातारी माणसं तासन् तास रांगेत उभी राहून तुझ्या पायाशी आली की, त्यांना ढकलून दिले जाऊ लागले. मात्र नेते-अभिनेते आले की, त्यांच्यासाठी मंडळाचे पदाधिकारी पायघड्या अंथरू लागले. बाप्पा हा सगळा प्रकार तुझ्या नजरेसमोर होताना तू गप्प कसा बसतोस..? मोठमोठे राजकारणी येतात म्हणून पोलिसही हतबलपणे जे काही चालू आहे ते हातावर हात ठेवून पाहत बसतात. काही करायला जावे तर कार्यकर्ते पोलिसांनाही मारायला कमी करत नाहीत. हे काय चालू आहे बाप्पा..?

तू तर सुखकर्ता... दु:खहर्ता... मग तुझ्या दर्शनाचे सुख हिरावून घेतले जात असताना तू गप्प कसा..? त्याचवेळी राज्यभर तुझ्या दर्शनासाठी येणाऱ्या भक्तांना कसलाही त्रास होत नाही... धक्काबुक्की होत नाही... याचा अर्थ तू लालबाग परिसरात नाहीस, असा आम्ही काढायचा का? कारण तू तिथे असतास, तर तुझ्या दर्शनाला येताना काय दिव्यातून जावे लागते हे तू पाहिले असतेस आणि ते थांबवलेही असतेस..! किमान नतद्रष्ट कार्यकर्त्यांना तू सद् बुद्धी तरी दिली असतीस. तू तिथे नाहीस म्हणून त्यांना सद् बुद्धी कोणी देत नसेल. मग जिथे तू नाहीस, तिथे तू आमच्या नवसाला कसा पावणार..? संत चोखामेळा यांनी काही वर्षे आधी करून ठेवलेले वर्णन तुझ्या बाबतीतही लागू होते का रे बाप्पा?
ऊस डोंगा परी रस नव्हे डोंगा । 
काय भुललासी वरलीया रंगा ॥ 
कमान डोंगी परी तीर नोहे डोंगा । 
काय भुललासी वरलीया रंगा ॥ 
चोखा डोंगा परी भाव नव्हे डोंगा । 
काय भुललासी वरलीया रंगा ॥ 
डोंगा म्हणजे वाकडा तिकडा. ऊस दिसताना वाकडा तिकडा दिसला तरी त्याचा रस गोडच असतो. रसाची गोडी वाकडी-तिकडी नसते. म्हणून आपण वरवरच्या रंगाला भुलू नये. फसू नये. रंग, आकार या दोन्ही गोष्टी म्हणजे बाहेरचे आवरण. ते अगदी वरवरचे स्तर आहेत. त्यालाच आपण बळी पडलो तर गाभ्यातल्या मूळ तत्त्वाशी आपली भेट होणार नाही. आपले मीलन होणार नाही. म्हणून संत चोखामेळा म्हणतात, ‘मी जरी वाकडा वाटलो तरी माझा भाव भोळा आहे... सरळ आहे...’

बाप्पा तुझेही असेच आहे ना. घरीदारी आम्ही तुला आणतो. तुझी प्राणप्रतिष्ठा करतो. तुझी सेवा घरी करायचे सोडून आम्ही लालबागच्या रांगेत दिवस घालवतो. चोखामेळा तर फार वर्षांपूर्वीचे. सध्या जमाना सोशल मीडियाचा आहे. व्हॉट्सॲपवर एक चित्र खूप व्हायरल झाले आहे. तुला माहिती असावे म्हणून त्यात लिहिलेला मजकूर इथे देत आहे. ताे फार मजेशीर आहे.

लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी धक्काबुक्की खाऊन, थकून आलेल्या भक्ताला घरचा गणपती विचारतो, ‘सोनू, तुला माझ्यावर भरोसा नाय का..?’ बाप्पा ही आजच्या पिढीची भाषा आहे. मात्र, भावना थेट भिडणाऱ्या आहेत. त्या तुझ्यापर्यंत पोहोचल्या असतीलच. बघ, जाता जाता तुझ्या नावावर वाटेल तसे वागणाऱ्यांना सद् बुद्धी देता आली तर... पुढच्या वर्षी भेटूच... तेवढ्याच श्रद्धेने... तेवढ्याच आपुलकीने... 
- तुझाच बाबूराव

 

Web Title: Lalbagh or Siddhivinayak, where exactly are you..?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.