शहीद कुटुंबियांच्या मदतीला आला "लालबागचा राजा"
By ऑनलाइन लोकमत | Published: March 7, 2019 05:05 PM2019-03-07T17:05:53+5:302019-03-07T17:06:30+5:30
बुलडाणा जिल्ह्यातील सीआरपीएफमधील दोन जवानांच्या कुटुंबियांना मुंबई येथील लालबागचा राजा गणेशोत्सव मंडळाच्या वतीने दहा लाख रुपयांची आर्थिक मदत करण्यात आली
बुलढाणा - पुलवामा येथे अतिरेक्यांच्या आत्मघातकी हल्ल्यात सीआरपीएफचे 40 जवान शहीद झाले होते, यामध्ये महाराष्ट्रातील बुलढाणा जिल्ह्यात 2 जवान शहीद झाले. बुलडाणा जिल्ह्यातील सीआरपीएफमधील दोन जवानांच्या कुटुंबियांना मुंबई येथील लालबागचा राजा गणेशोत्सव मंडळाच्या वतीने दहा लाख रुपयांची आर्थिक मदत करण्यात आली आहे. 6 मार्च रोजी मुंबईतच झालेल्या कार्यक्रमात ही मदत प्रदान करण्यात आली.
गेल्या महिन्यात पुलवामा येथे झालेल्या आत्मघातकी हल्ल्यात बुलडाणा जिल्ह्यातील मलकापूर येथील संजय राजपूत आणि लोणार तालुक्यातील चोरपाग्रा (वीरपांग्रा) येथील नितीन राठोड हे दोन जवान शहीद झाले होते. या हल्ल्यात जवळपास ४४ जवानांना वीर मरण आले होते. यातील बुलडाणा जिल्ह्यातील दोन्ही शहीद जवानांच्या कुटुंबियांना प्रत्येकी पाच लाख रुपये प्रमाणे ही आर्थिक मदत करण्यात आली आहे. बुलडाणा शिवसेनेच्या पुढाकारातून ही मदत देण्यात आली आहे.
या कार्यक्रमास खा. अरविंद सावंत, मुंबईचे महापौर विश्वनाथ महाडेश्वर, लालबागचा राजा मंडळाचे अध्यक्ष बाळासाहेब कांबळे, आ. अजय चौधरी, मंडळाचे सचिव सुधीर साळवी, खजिनदार मंगेश दळवी, बुलडाण्याचे शिवसेनेचे जिल्हा प्रमुख जालिंदर बुधवर, मेहकरचे सचिन पडवळ, बुलडाणा विधानसबा संपर्क प्रमुख राजेंद्र राणे यांच्यासह शहीद कुटुंबातील सदस्य प्रामुख्याने उपस्थित होते.
दहशतवाद्यांच्या आडून शेजारील देश आपल्या देशात कुरापती करत आहे. दहशतवादाचा संपूर्णपणे नायनट झाला पाहिजे. शासनासोबतच प्रत्येक नागरिक शहीद जवानांच्या कुटुंबियांच्या पाठीशी आहे. या कुटुंबांचा त्याग मोठा आहे. त्याचे मुल्यमापन करता येणार नाही. अशा शहीदांसोबतच त्यांच्या कुटुंबियांचा संपूर्ण देशाला अभिमान आहे, अशी भावना या प्रसंगी उपस्थित मान्यवरांनी व्यक्त करीत ही मदत मातृतिर्थ जिल्ह्यातील दोन्ही शहीद कुटुंबियांना प्रदान केली.
द्वयनेत्री अश्रू आणि अभिमान
देशाप्रती कर्तव्य बजावताना भाड्या हल्ल्यात शहीद झालेल्या जवानांच्या कुटुंबियांच्या द्वयनेत्रामध्ये एकाच वेळी आश्रू आणि अभिमान झळकत आहे. शहीद कुटुंबियांचा त्याग हा सर्वोच्च आहे. या कुटुबियांना त्यानुषंगाने मदत व्हावी, या भावनेतून खा. प्रतापराव जाधव यांच्या पाठपुराव्यातून शहीद कुटुबांना ही मदत करण्यासाठी प्रयत्न केला. जवानांचे बलिदान कदापीही नागरिक विसरू शकणार नाही, अशी भावना, जालिंदर बुधवत यांनी यावेळी व्यक्त केली.