मुंबई - लालबागचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाने गुरुवारपासून राजा चरणी दान झालेल्या दागिन्यांच्या लिलावास सुरूवात केली आहे़ पहिल्या दिवशीच्या लिलावातून १ कोटी ४ लाख रुपये जमा झाल्याची माहिती मंडळाने दिली. २००हून अधिक भाविकांनी या लिलावात भाग घेतला होता. शनिवारी दुसऱ्या दिवशी लहान वस्तूंचा लिलाव पार पडणार आहे.लालबागचा राजा चरणी आलेल्या १ किलो २७० ग्रॅम वजनदार मूर्तीची अधिक चर्चा होती. लिलावात मूर्तीची किंमत ३९ लाख ४० हजार १०० रुपये ठेवण्यात आली होती, ती संजीवभाई दौडवाल या भाविकाने ३५ लाख ७५ हजारांची बोली लावत विकत घेतली. तसेच दौडवाल यांनी १ किलोची कॅडबरीही ३१ लाख २५ हजारांना घेतली. एकूण १ कोटी ९ लाख ७७ हजार ५५ रुपयांच्या वस्तूंचा लिलाव करण्यात आला.दरम्यान, गतवर्षी काही भाविकांनी चार दुचाकीही लालबाग राजा चरणी दान केल्या होत्या. यंदा मात्र कोणत्याही प्रकारचे वाहन दान केले नसल्याचे मंडळाने स्पष्ट केले.चांदीच्या वस्तूंना मानचांदीच्या वस्तूंना मान मिळाला असून त्यांची अधिक खरेदी झाल्याचे मंडळाचे खजिनदार मंगेश दळवी यांनी सांगितले. ते म्हणाले की, छोट्या वस्तूंची विक्री शनिवारी होईल. तत्पूर्वी गणेशोत्सव काळात दानपेटीतून बाप्पाच्या चरणी तब्बल ६ कोटी ७० लाख रुपये जमा झाले. गतवर्षी ही रक्कम ६ कोटी १० लाख रुपये इतकी होती. शिवाय ७५ किलो चांदी, साडेपाच किलो सोने भक्तांनी दान केले आहे.
लालबागचा ‘राजा’च्या तिजोरीत वाढ
By ऑनलाइन लोकमत | Published: September 29, 2018 7:36 AM